रक्तदानाने स्नेहबंध वाढवण्याचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचे आवाहन
अंबाजोगाई : ‘जाणू या रक्तदानाचं महत्व आणि जपू या माणुसकीचं तत्व’ या प्रमाणे रक्तदानाने समाजाचा स्नेहबंध वाढवूया असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी रक्त संकलन मोहीमेचा शुभारंभ करताना केले. आज शुभारंभ दिवशीच या केंद्रांतंर्गत येणाऱ्या तीन केंद्रातुन 250 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रग्णालयामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याकरीता वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात विविध मोहीम व अभियान सुरु करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व पंचायत राज क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन तसेच या विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे शासकीय रक्त केंद्राअंतर्गत रक्तदात्यांमध्ये विविध माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करणे तसेच जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसंकलन करण्यासाठी रक्तदान अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक मोलाची नाती निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून राज्यात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय रक्तदान मोहीम आयोजित करण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला तो वेळेवर उपलब्ध करता यावा, यासाठी सर्वांनी रक्तदान मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने कार्यक्रमादरम्यान मंत्री गिरीष महाजन व सचिव डॉ. अश्विनी जोशी यांचा संदेश सर्वांना ऐकवण्यात आला. रक्तकेंद्र विभागाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या रुग्णसेवेदरम्यान अनिमियाग्रस्त रुग्ण, शैलेसेमियाग्रस्त रुग्ण, प्रसूती दरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. त्याचप्रमाणे अपघातातील जखमी आणि शस्त्रक्रिया दरम्यान अनेक रुग्णांना रक्ताची निकड भासत असते. अशा रुग्णांसाठी विभागामार्फत सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्याद्वारे रक्त उपलब्ध करण्यात येते. मात्र, सध्याची वाढती लोकसंख्या आणि दिवसागणिक अपघाताचे तसेच आजारांचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मुबलक रक्तपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यभरात रक्तदान मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वसामान्यांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करणे, रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून रक्तदानाचे महत्त्व जनतेला पटवून देणे व रक्ताचा तुटवडा भासणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचा रक्तकेंद्र विभागाचा मानस आहे.
आज रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, येथे शासकीय रक्त केंद्राच्या अंतर्गत दिंद्रुड, नागापूर व शासकीय रक्त केंद्र अशी एकूण 3 रक्तदान शिबिरे आयोजित करून 250 पेक्षा जास्त रक्तसंकलन करण्यात आले. तसेच ‘एमबीबीएस’ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान या विषयावर पथनाट्य सादर केले व रक्तदान जनजागृती विषयक व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्याने रक्तदान करून मोहिमेची सुरवात केली. या कार्यक्रमासाठी रक्तदानाचा संदेश देणारी सुंदर रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजेश कचरे, डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. शंकर धपाटे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. संदीप निळेकर, डॉ. मोगरेकर, डॉ. सुनिता हंडरगुळे, डॉ. दिपाली देव, डॉ. नितीन चाटे , मैट्रन उषा भताने आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शरीरविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शीला गायकवाड, सहयोगी प्राध्यापक डॉ. मानेश्वर जाधव, सहयोगी प्राध्यापक डॉ. कदम तर सहाय्यक प्राध्यापक लसर व तसेच पदव्युत्तर, पदवीपूर्व विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.