अंबाजोगाई : शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बालनिकेतन विद्यालयात इयत्ता आठवीत असणाऱ्या कु. सई संतोष मोहिते हिने निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले. बक्षीस स्वरूपात तिला मिळालेली नवीन सायकल तिने तत्काळ गरजु मुलीला देऊन बालवयात आपले दातृत्व व मनाचा दिलदारपणा दाखवून दिला.
अंबाजोगाईत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. शनिवारी शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारित स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बालनिकेतन विद्यालयात इयत्ता आठवीत असणाऱ्या कु. सई संतोष मोहिते हिने स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले.
बक्षीस स्वरूपात तिला नवीन सायकल देण्यात आली. हे मोठे बक्षीस तिला मिळाले होते. तरीही तिने माझ्याकडे स्वतःची चांगली सायकल आहे. ही सायकल गरजू मुलीला द्या, अशी इच्छा संयोजन समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांच्याकडे व्यक्त केली. यामुळे गरीब विद्यार्थिनीला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ व मदत होईल, या उद्देशाने सई हिने मनाचा दिलदारपणा दाखवत मिळालेली नवीन सायकल तिने तत्काळ गरजू मुलीला देऊन बालवयात आपले दातृत्व व मनाचा दिलदारपणा दाखवून दिला.
शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल लोमटे यांनी वेणूताई चव्हाण कन्या शाळेत अशी होतकरू मुलगी शोधून तिला सई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकल भेट दिली. सई हिने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत त्यांची जयंती साजरी केली. तिच्या या दिलदार पणाचे कौतुक सर्वत्र होत आहे.