अंबाजोगाई : राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन श्रमिकांना प्रतिष्ठा देणारे ठरेल, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी केले. जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, धानोरा ता. अंबाजोगाई यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन हे 11 व 12 मार्च 2023 रोजी अंबाजोगाईत होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून लातूरचे ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्र महाविकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी अंबाजोगाई येथे झालेल्या संमेलनाच्या कार्यकारी मंडळ व सल्लागार समिती सदस्यांच्या आढावा बैठकीत प्रतिपादन केले.
अंबाजोगाई येथील विश्रामगृहात झालेल्या संमेलन आढावा बैठकीच्या प्रारंभी संमेलनाचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांचे बहूभाषिक परिवर्तन संमेलनाचे स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांनी शाल, पुष्पहार देवून स्वागत केले. संमेलनाचे संयोजक व कार्यालयीन सचिव विद्याधर पांडे यांनी आत्तापर्यंत संमेलनाच्या संदर्भात झालेल्या कार्याचा व नियोजित कार्यक्रम पत्रिकेच्या मसुदेचे वाचन करुन संमेलनास उपस्थित राहणार्या राज्यस्तरीय मान्यवर पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
आपल्या विस्तारीत मार्गदर्शनात बोलतांना अॅड. अण्णाराव पाटील यांनी आतापर्यंत झालेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करुन काही सूचना केल्या. मानवातील विकाराचा नाश करतोे, त्यालाच साहित्य म्हणावे. आपल्या बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनातून समाजातील प्रत्येक घटकाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संमेलनास येणारे राज्यातील व देशातील अभ्यासू साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व या संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या संमेलनातून समाजाला चांगला संदेश जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी संमेलनाचे पदाधिकारी व सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी आपापला परिचय करुन दिला. अॅड. अण्णाराव पाटील यांच्या समवेत आलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतअप्पा उबाळे व महासचिव अॅड. अनिरुद्ध येंचाळे यांचे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. धर्मराज माले व कोषाध्यक्ष वसंतराव मोरे यांनी शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
या बैठकीस अध्यक्ष डॉ. धर्मराज माले, कार्याध्यक्ष मुजीब काझी, उपाध्यक्ष सुरेश खंदारे, सचिव चंद्रकांत वडमारे व डॉ. देवराव चामनर, कोषाध्यक्ष वसंतराव मोरे, अॅड. अनंतराव जगतकर, विश्वंभरराव वराट गुरुजी, तारेखअली उस्मानी, चंद्रकांत हजारे, रावसाहेब घाडगे, विरेन्द्र गुप्ता, समियोद्दीन मोमीन, ताहेर चाऊस, माणिकराव बावणे, गजानन मुडेगावकर, प्रा. सिद्धार्थ तायडे, बा.सो.कांबळे सर, सखा गायकवाड, रऊफ बागवान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रावसाहेब घाडगे यांनी केले.