आशिष निनगुरकर
एकूणच भारतामध्ये सस्पेन्स – हॉरर चित्रपट अभावानेच बनतात. जे बनतात त्यातले बहुतांश चित्रपट रहस्यमय किंवा भयप्रद न वाटता कंटाळवाणे, रटाळ किंवा हास्यास्पद वाटतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाला भयप्रद किंवा रहस्यमय बनविण्याच्या नादात चित्रपट मूळ कथेपासून भरकटत जातो. अनेकदा यामध्ये चांगल्या कथानकाचीही वाट लागते. अर्थात यालाही अपवाद काही चित्रपट आहेतच, पण यामध्येही दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा आहे, परंतु मराठीमध्येही काही उत्तमोत्तम भयपट बनले आहेत ज्यामध्ये भय, उत्कंठा आणि रहस्याची उत्तम गुंफण करण्यात आली आहे. असाच एक नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘व्हिक्टोरिया.’
निर्माता आनंद पंडित, रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. विराजस आणि जीत अशोक यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव देणारा असा हा चित्रपट आहे. युकेमधील ‘व्हिक्टोरिया’ नावाच्या एका आलिशान हॉटेलपासून सिनेमाची सुरुवात होते. हॉटेलमध्ये रेणुका नावाच्या एका स्त्रीचा मृत्यू झालेला असतो.
सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे दोघे हॉटेलमध्ये राहायला जातात आणि या कथेतील थरार सुरू होतो. ती दोघं या हॉटेलच्या प्रतिबंधित जागेत जाण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात पुष्कर जोग त्यांना अडवतो. तेव्हापासून सोनालीला त्या हॉटेलमध्ये रेणुकाचे भूत दिसायला लागतं. ती दोघे हॉटेलमधून कशी बाहेर पडणार आणि त्या भूताचं पुढे काय होणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. लेखन आणि अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळलेला विराजस कुलकर्णी आणि त्याचा मित्र जीत आकाश यांनी पदार्पणातच हॉरर मिस्ट्री थ्रिलर हा काहीसा आव्हानात्मक जॉनर हाताळला आहे. चित्रपटाची कथा स्कॉटलंडमध्ये घडत असून तिथे घडलेल्या मिस्ट्रीचा थरारक शैलीत पर्दाफाश करण्याचं काम दिग्दर्शक द्वयींनी केलं आहे. त्यांना मिळालेली कलाकारांची उत्तम साथ हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ठ्य आहे.
चित्रपटाची कथा अंकिता आणि सिद्धार्थ या जोडप्याभोवती गुंफण्यात आली आहे. सिद्धार्थच्या वडिलांच्या सांगण्यावरून दोघंही आराम करण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आपल्या अधिराज काकांच्या घरी येतात. अधिराज दोघांना घेऊन बर्याच दिवसांपासून बंद असलेल्या व्हिक्टोरिया हॉटेलवर जातो. तिथे तो एकटाच राहत असतो. हॉटेलमध्ये पोहचल्यावर अंकिताला तिथे कोणते तरी भास होऊ लागतात. सिद्धार्थ त्याकडे दुर्लक्ष करतो, पण अंकिताचं मन काही मानायला तयार नसतं. त्या रहस्याचा शोध घेत ती हॉटेलमधील निर्बंधित क्षेत्रात जाते. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात आहे. मिस्ट्री असल्यानं अखेरच्या क्षणापर्यंत रहस्य उलगडू न देण्याचं काम विराजसनं पटकथेत केलं आहे. कित्येकदा संभ्रमात टाकणारे आणि पुढे नेमकं काय घडणार आहे याचा थांगपत्ता न लागू देणारे संवाद यात आहेत. चित्रपटाची गती सुरुवातीपासूनच काहीशी मंद वाटते. नायिकेला असलेल्या आजारामुळे आराम करण्यासाठी नायकासोबत तिचं स्कॉटलंडला येणं यामुळे हा चित्रपट म्हणजे काहीशी शॉकींग ट्रीटमेंट असण्याची शक्यता वाटते, पण क्लायमॅक्समध्ये काहीसं वेगळं आणि आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळतं.
सुरेख कॅमेरावर्क आणि नेहमीपेक्षा वेगळं पार्श्वसंगीत यात आहे. चित्रपटात मुख्य कॅरेक्टरखेरीज कोणी नसले तरी संपूर्ण स्कॉटलंड शहरात, तिथल्या रस्त्यांवर लॉकडाऊनसदृश परिस्थिती का भासवण्यात आली ते समजत नाही. क्लायमॅक्समध्ये नायिकेला अंतर्ज्ञानानं सर्व काही समजतं आणि ती खलनायकासमोर त्याच्या कृत्याचा संपूर्ण पाढा दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याप्रमाणे वाचून दाखवते हे पचवणं थोडं अवघड जातं. हॉटेलमध्ये एकही माणूस कामाला नसूनही अधिराजचं स्टाफबाबत सांगणं खटकतं आणि त्या हॉटेलमध्ये स्टाफ दिसतदेखील नाही. दिग्दर्शनात काही उणिवा राहिल्या असल्या तरी विराजस आणि जीतचा पदार्पणातील प्रयत्न चांगला झाला आहे. तांत्रिकदृष्ठ्या चित्रपट सक्षम आहे. या हॉरर चित्रपटात गाणे नाही. त्यामुळे सिनेमाची पकड टिकून राहते व उत्तरोत्तर उत्कंठा वाढत जाते. एक वेगळीच सोनाली कुलकर्णी यात पाहायला मिळते. अंकिताची भूमिका तिनं खूप मेहनतीनं साकारली आहे. आशय कुलकर्णीचं कॅरेक्टर थोडं बिनधास्त असून त्यानं त्याच शैलीत ते साकारलं आहे. पुष्कर जोगचं एक वेगळं रूप या चित्रपटात पाहायला मिळतं. अभिनयाच्या दृष्टिकोनातून काहीसा परिपक्व होत असलेला पुष्कर यात दिसतो. सिनेमातील त्याचा लूकदेखील भावतो. सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.
उत्तम आधुनिक तंत्रज्ञान, वेगळ्या धाटणीची कथा या भरवशावर मराठीतही उत्तम भयपट निर्माण होऊ शकतो हे या चित्रपटातून सिद्ध झालंय असं वाटतं. जशा चांगल्या बाजू, तशाच थोड्या कमतरताही जाणवतात. काही प्रसंग संथ आहेत. ते ‘कॉम्पॅक्ट’ करता येऊ शकले असते असं वाटतं. सुरुवातीला सिनेमाच्या कथानकात शिरायला थोडा वेळ लागतो, पण नंतर एकेक प्रसंग कळू लागतात. पहिल्या भागापेक्षा दुसर्या भागात थरार अधिक जाणवतो. उत्सुकता ताणली जाते. दुसरा भाग अधिक रोमांचक, भयकारी झालाय असं वाटतं. दुसर्या भागातील काही दृश्ये अंगावर येतात. बॅकग्राऊंड संगीत अप्रतिम झाले आहे, मात्र सर्व काही अधिकच जलद गतीनं होतं. तरीही कथेवरची पकड सुटत नाही. पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, लोकेशन्स या सर्व सिनेमाच्या सकारात्मक बाजू आहेत, तर क्लायमॅक्समधील काही उणिवा, सिनेमाची मंदावलेली गती यामुळे थोडे लक्ष विचलित होते. थोडक्यात सांगायचे तर पदार्पणात दोन नवोदित दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना थरारक अनुभव देण्याचा चांगला प्रयत्न केला असल्याने उणिवांकडे दुर्लक्ष करून हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा.
– (लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)