बीड : शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज सलग तिसऱ्या आठवड्यात नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सकाळी नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणा सोबत घेऊन जेसीबी, पोकलेन आणि ट्रॅक्टर्सच्या सहाय्यानं शहरामधल्या कंकालेश्वर चौक परिसर आणि जुना मोंढा परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा काढण्यात आला.
बिंदुसरा नदीचं पात्र साडेपाच ते सहा किलोमीटरचं आहे. हे पात्र स्वच्छ होईपर्यंत ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे. प्रशासनानं घेतलेल्या पुढाकारानंतर आता नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग वाढवावा, असं आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर, 7 जानेवारीपासून सुरू झालेल्या या नदी स्वच्छता मोहिमेसाठी स्वयंसेवी संस्थाही पुढे येत आहेत.