पुणे : उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हायर एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे ‘भारतात उच्च शिक्षणातील धोरण निश्चिती आणि परिवर्तन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला डॉ. विश्वनाथ कराड, वरमॉन्ट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमाला, एमआयटी कानपूरचे माजी संचालक पद्मश्री संजय धांडे, बफेलो विद्यापीठाचे अध्यक्ष सतीश त्रिपाठी, एआययुच्या सचिव श्रीमती पंकज मित्तल, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे कुलपती प्रदीप खोसला, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षणाबाबत विचार करताना उद्दिष्ट निश्चित करून त्याकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. त्यादृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरू शकेल. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेने शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचा विचार करण्यासोबत जागतिक शिक्षण क्षेत्रात अनुकूल बदलाचा विचार करण्यासाठी एक मंच तयार करावा. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारताने जगाला दिलेला विचार आहे. शांतताप्रिय जागतिक समाज घडविण्यासाठी एकत्रितपणे विचार करावा लागेल. त्यासाठी शिक्षणात मूल्यांचा समावेश करणे उपयुक्त ठरेल.