मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या – त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली.
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केल्यानंतर पुढील वाटचालीबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ‘वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे. आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
‘काल – परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. त्याची आज रितसर घोषणा करण्यात आली.