अंबाजोगाईत पत्रकार परिषदेचे आयोजन
अंबाजोगाई : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहास्तव आपण बर्दापूर जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढविणार आहोत, असे जाहीर केले आहे. तसेच सर्वांना सोबत घेवून नांदगावसह संपूर्ण बर्दापूर जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण कटिबद्ध आहोत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रपरिषदेतून दिली.
अंबाजोगाईतील हाॅटेल कृष्णाईच्या हाॅलमध्ये सोमवार, दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अमोल चव्हाण म्हणाले की, माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देवून नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पुढे बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण यांनी सांगितले की, मी मागील काही वर्षांपासून परळी व केज मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत मी शेतकर्यांच्या बाबतीत संवेदनशीलता जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे, या कुटुंबाला सर्वोतोपरी सहकार्य करीत शेतकरी विमा लागू करून देण्यासाठी तसेच शासनस्तरावर विम्यासह विविध योजना, अनुदान, मदतीचा लाभ मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या अनुषंगाने त्यांना शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. जेष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ मानधन योजना, निराधारांना मदत योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. वेळोवेळी शासन व प्रशासनास निवेदने देऊन मागण्या मान्य करून घेतल्या आहेत, तसेच आपण सामाजिक दायित्व निभावताना नांदगाव आणि परीसरातील सर्वसामान्य लोकांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी शासकीय किंवा खाजगी दवाखाना असो नाही तर पोलिस स्टेशन, महावितरण कंपनीकडून डी.पी. मिळविणे, शेतकरी पिक विमा, सोयाबीन अनुदान, अळीच्या प्रादुर्भावाचे अनुदान, निसर्गाच्या अवकाळीपणातून झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व त्याची भरपाई, मावेजा मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून मागण्या केलेल्या आहेत. गरजूंना विविध मूलभूत योजना पुरविण्यासाठी तसेच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आमच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे.
या समाजकार्याच्या बळावरच माझ्यासह, आम्ही नांदगाव ग्रामस्थांनी एकत्र येवून जो पॅनल उभा केला, त्याला नांदगावच्या सुजाण नागरिक व मतदारांनी भरघोस मते देऊन आमचा पॅनल मताधिक्याने निवडून दिला, या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सरचिटणीस संतोष नागरगोजे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी माझी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून पुढील कार्यास शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत. असे सांगून अमोल चव्हाण म्हणाले की, बीड जिल्हा परिषद निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना लढविणार आहोत, अंबाजोगाई तालुक्यातील व परळी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या बर्दापूर सर्कल मधून मी अमोल चव्हाण यांनी निवडणूक लढवावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना कार्यकर्त्यांची, मित्र परीवार आणि नातेवाईक यांची इच्छा व मागणी आहे.
त्यानुसार बर्दापूर जिल्हा परिषद गटात आम्ही ताकदीने निवडणूक लढविणार असून सर्वसामान्य व बहुजन घटकांना न्याय देण्यासाठी व जातीपाती, साम – दाम – दंड – भेद या राजकारणाचा अंत करण्यासाठी मनसे प्रत्येक निवडणूकीत नेहमीच जनजागृती करीत असते, समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब बहुजन वंचित जनतेला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कटिबद्ध आहे, याच विचाराने आज आम्ही मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढविणार आहे, असा निर्णय नुकताच कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला असून ही निवडणूक मनसेकडून मोठ्या ताकदीने लढविली जाईल.
बर्दापूर सर्कल या भागात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. कायम राजकारणात आम्हीच पाहिजे, असा काही लोकांचा मतप्रवाह बनला आहे. बहुजन समाज आज राजकारणातून हद्दपार होत चालला असून सामान्य जनता आता निवडणूक कधी येईल व परिवर्तन कसे करता येईल याची मोठ्या अतुरतेने वाट पाहत आहे, म्हणून ही निवडणूक मनसे ताकदीने लढवेल, असा निर्णय मनसे कार्यकर्त्यांच्या बैठीत झाल्याचे मनसे शेतकरी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण यांनी सांगितले आहे. बीड जिल्हा परिषद बर्दापूर गटात वंचित घटकांना न्याय का दिला जात नाही, त्यांच्या हक्काच्या योजना कुठे आहेत. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी सर्वच समाजातील वंचितांना फसविले आहे, याचे उत्तर निवडणूक काळात मुख्य राजकीय पक्षांना द्यावेच लागेल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे.