भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला दिली धडक
अंबाजोगाई : अंबाजोगाईतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना वाढतचं असून आज पुन्हा लोखंडी सावरगाव जवळ अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि.18) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. संजय अंकुश डहाणे (वय 50, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, कोदरी येथील संजय डहाणे, रवींद्र दगडू जाधव (वय 53) आणि बालासाहेब शेषेराव कदम (वय 47) हे तिघेजण अंबाजोगाईहून दुपारी गावाकडे दुचाकीवरून (एमएच 44 एन 4352) निघाले होते. ते लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या औरंगाबाद – अंबाजोगाई एसटी बसने (एमएच 20 बीएल 0514) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचार सुरु असताना संजय डहाणे यांचा मृत्यू झाला. तर, उर्वरित दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.
दरम्यान, महामार्गाच्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील काही पच विनाकारण अपूर्ण सोडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. चार दिवसापूर्वीच या ठिकाणी फोर्च्युनर आणि रिक्षाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याची कामे तातडीने करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.