अंबाजोगाई : मागील तेरा ते चौदा महिन्यापूर्वी अंबाजोगाई नगरपरिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येऊन नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून मुख्याधिकारी हे कार्यभार सांभाळत आहेत. नगरपरिषदेतील स्वच्छता कामगारांना दोन महिन्यांपासूनचे वेतन न मिळाल्याने त्यांनी ‘कामबंद’ आंदोलन केले होते. मात्र, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे, अशी चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली.
जोपर्यंत कामगारांना थकीत वेतन मिळत नाही, तोपर्यंत कुठलाही कामगार कामावर येणार नाही, अशी भूमिका प्रहारचे अशोक गंडले यांनी लावून धरली, त्यात ते यशस्वी झाले. कामगार, त्यांचे नेते आणि प्रशासनात व कंत्राटदारात समन्वय घडवत केवळ अंबाजोगाई शहरातील नागरिकांचा विचार करून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी स्वतः मध्यस्थी करत कंत्राटी स्वच्छता कामगारांना त्यांचे थकीत वेतन देऊ केले. या अगोदरही प्रशासकाच्या काळामध्येच तीन ते चार वेळा मोदींनी मध्यस्थी करून त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला होता.
तसेच यापुढेही आपण अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष राजकीशोर मोदी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.