बर्दापूरात दुकान फोडले :  सव्वा लाख रुपायांच्या साहित्याची चोरी

अंबाजोगाई : तालुक्यात रात्री – अपरात्री चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत असून काल शनिवारी (दि.14) रात्री बर्दापूर येथील मोटर्स ॲन्ड बॅटरी सेंटरचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपायांच्या साहित्याची चोरी दुकानातून केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बर्दापूर गावात खदिर शब्बीर शेख यांचे मेट्रो मोटर्स ॲन्ड बॅटरी सेंटरचे दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटुन सहा – चारचाकी गाड्यांच्या चार्जिंगला आलेल्या बॅटऱ्या, चारचाकी वाहनांचे आर्मीचर, मोटार सायकलच्या जुन्या भंगार कामकाजासाठी आणलेल्या बॅटऱ्या असा एकूण सव्वा लाख रुपायांच्या साहित्याची चोरी केली आहे. 

खदिर शब्बीर शेख यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करित आहेत.