डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. अंबाजोगाई शहरातही विविध महाविद्यालयात नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. 

औरंगाबाद इथं विद्यापीठ परिसरात विविध संस्था, संघटनांच्यावतीनं अभिवादनसभेसह विविध उपक्रमातून बाबासाहेबांना तसंच नामांतरासाठी लढा दिलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. भीमगीतं तसंच पोवाडे गायनासह या परिसरात अनेक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, विद्यापीठात डॉ. ईश्वर नंदपुरे यांचं आज ‘नामविस्तार एक दृष्टीकोन’ या विषयावर विशेष व्याख्यान झालं. नामांतराचा लढा हा फक्त नाव बदलण्यापुरता नव्हे तर सामाजिक परिवर्तन, आत्मसन्माचा लढा होता, असं मत डॉ. नंदपुरे यांनी व्यक्त केलं. नामविस्ताराच्या 28 वर्षानंतरही आपण परिवर्तनाचा विचार, विस्तार केला नाही. ज्या दिवशी आपण याचा स्वीकार करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं लढ्याचं वर्तुळ पूर्ण होईल, असं डॉ. नंदपुरे यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या वैचारिक वारसा घेऊन मराठी माणूस आजही आत्मसन्मान, परिवर्तनाची लढाई लढतो आहे. परिवर्तनाचा हा लढा हा अधिक नेटानं पुढे नेण्याची गरज डॉ. नंदपुरे यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, नामविस्तार दिनाच्या अनुषंगानं कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यार्थ्यांच्या कमवा आणि शिका योजनेच्या मानधनात 90 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना आता 70 रुपयांऐवजी 160 रूपये प्रतिदिन मानधन मिळणार आहे. सध्या या योजनेत एकूण 480 विद्यार्थी असून यामध्ये 274 मुलं आणि 204 मुलींचा समावेश आहे.