‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’… ख्यातनाम गायक येसूदास झाले 84 वर्षांचे : सरकारला सांगितलं होतं आता मला पुरस्कार देऊ नका !

टीम AM : ख्यातनाम शास्त्रीय संगीतकार, गायक के. जे. येसूदास यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1940 कोची येथे झाला. कट्टासेरी जोसेफ येसुदास हे के. जे. येसूदास यांचे पूर्ण नाव. गोरी तेरा गांव बड़ा प्यारा’, ‘सुरमई अखियों में’, ‘दिल के टुकड़े – टुकड़े करके’, ‘जानेमन –  जानेमन तेरे दो नयन’, ‘चांद जैसे मुखड़े पे’, ‘निसा गमा पनी सारे गा’ या सारखी अप्रतीम गाणी देणारे येसुदास यांचे वडील मल्याळम शास्त्रीय संगीतकार होते.

येसुदास यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, वयाच्या सातव्या वर्षी कोची स्थानिक स्पर्धत भाग घेतला तेव्हा त्यांनी सुवर्णपदक जिंकले. सुरवातीचे संगीताचे शिक्षण त्यांनी आर. एल. वी. संगीत (Thrippunithura) अकादमी येथे केले. येसुदास गाण्याची निवड फारच विचार पूर्वक करीत असतात. सध्याच्या पध्दतीची गाणी त्यांना आवडत नाहीत. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात 1961 मध्ये केली. 1970 च्या पासून येसूदास हिंदी गाणी गात आहेत. 

येसूदास यांनी 14 भाषेत जवळजवळ आजपर्यंत 45000 गाणी गायली आहेत. येसुदास यांनी हिन्दी सोडून मल्याळी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, गुजराती, उडिया, मराठी, पंजाबी, संस्कृत, रशियन व अरबी भाषेत गाणी गायली आहेत. ते मल्याळम चित्रपट उद्योगात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांनी पहिले हिंदी गाणे गायन सुरु केले तो चित्रपट ‘जय जवान जय किसान’ होता, पण पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘छोटी छोटीसी बात’ होता.

येसूदास यांनी अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्या साठी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी याच्या समावेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली आहेत. हिंदीबरोबरच मराठीतही येशुदास यांनी मोजकीच सुरेल अशी गीते गायिली आहेत. त्यातील मराठीतील पहिले पार्श्‍वगायन केले ते 1991 साली आलेल्या नणंद – भावजय या चित्रपटातील. 

मायेची सावली, आनंदी बाहुली तसेच वारा आला भेटायला या गाण्यासाठी  तसेच संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिलेल्या माझा मुलगा या चित्रपटात ‘ही वेलीवरी उमले कळी’ ‘दूर दूर जाऊ या’ हे गाणी लोकप्रिय झाली होते. येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व तो प्राप्त करणारे ते  देशातील एकमेव गायक आहेत. केवळ गायकच म्हणून येशुदास यांनी काम केले नसून वडाक्कुम नाथम, मधुचंद्र लेखा, पट्टनथिल सुंदरन हे चित्रपट त्यांनी निर्माण केले होते तर काही चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून अभिनयही केला आहे. 

भारतीय संगीतात मोलाचे योगदान दिल्याने केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम ‘स्वाती पुरस्कारम’ हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल येशुदास यांना 1975 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार, सर्वश्रेष्ठ पार्श्‍वगायक, आंध्रप्रदेश राज्य फिल्म अ‍ॅवॉर्ड पाच वेळा, सर्वश्रेष्ठ पार्श्‍वगायक, कर्नाटक राज्य फिल्म अ‍ॅवॉर्ड तीन वेळा, तामिळनाडू पाच वेळा, पश्‍चिम बंगाल पाच वेळा तर केरळ राज्य 26 वेळा सर्वश्रेष्ठ पार्श्‍वगायक तर 1991 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला होता. 

येशुदास यांनी तरंगिनी नावाचा एक स्टुडिओ निर्माण केला असून या ठिकाणी शास्त्रीय तसेच इतर गीतांचे ध्वनिमुद्रण केले जात आहे. नवोदितांना याबाबतीत शिक्षण दिले जात आहे. त्यांचा मुलगा विजय येसूदास हा गीतकार आहे. येसूदास हे आपला वाढदिवस 2000 सालापासून कर्नाटकातील कोल्लुरमधील मुकांबिका देवीच्या मंदिरात गायन करून साजरा करत असतात. आपल्या समूहाकडून येसूदास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शब्दांकन : संजीव वेलणकर