‘बाबू मोशाय…जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं’ : राजेश खन्ना यांचा आज स्मृतिदिन, घरासमोर निर्माता – दिग्दर्शकांची असायची रांग

टीम AM : हिंदी चित्रपटसृष्टीला लागोपाठ हिट चित्रपट देणारे, मनोरंजन विश्वाचे पहिले ‘सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेश खन्ना जे आता आपल्यात नसतील, तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. ‘बाबू मोशाय…जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं’ सारखा त्यांचा संवाद आजही अनेकांच्या मनावर कोरला गेला आहे.

राजेश खन्ना यांनी केवळ आपल्या अभिनयानेच प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर चित्रपटसृष्टीतही त्यांनी विशेष योगदान दिले. राजेश खन्ना चित्रपटांमध्ये कोणतीही व्यक्तिरेखा साकारत असले तरी, ते पडद्यावर इतके वास्तववादी दिसायचे की, प्रेक्षक त्यात हरवून जायचा.

अभिनेता राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला होता. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना होते, चित्रपटात पाऊल ठेवल्यानंतर केके तलवार यांनी त्यांचे नाव बदलून राजेश खन्ना ठेवले. मात्र, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री त्यांना प्रेमाने ‘काका’ म्हणू लागली. राजेश खन्ना यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते, पण त्यांच्या वडिलांचा याला कडाडून विरोध होता.

राजेश खन्ना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला थिएटरमध्ये सामील झाले आणि नंतर युनायटेड प्रोड्युसर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘ऑल इंडिया टॅलेंट’ स्पर्धेत त्यांनी भाग घेतला, ज्यामध्ये ते विजेते ठरले. राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये चेतन आनंदच्या ‘आखरी खत’ या चित्रपटातून त्यांच्या सिने करिअरला सुरुवात केली होती. राजेश खन्ना यांनी 1969 ते 1971 पर्यंत सलग 15 सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांना चित्रपटात घेण्यासाठी निर्माता – दिग्दर्शक राजेश खन्ना यांच्या घराबाहेर रांगेत उभे असायचे. त्यांनी आपल्या चित्रपटात काम करावे यासाठी निर्माते त्यांना हवे तितके मानधन द्यायला तयार असायचे.

एकदा राजेश खन्ना यांना मूळव्याधाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यामुळे काही काळ ते कुठेही जाऊ शकले नाहीत. त्यावेळी, निर्मात्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आजूबाजूला खोल्या बुक केल्या होत्या, जेणेकरून संधी मिळताच ते आपल्या चित्रपटांची कथा राजेश खन्ना यांना ऐकवू शकतील.

‘राजेश खन्ना यांनी मार्च 1973 मध्ये आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा ‘बॉबी’ हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या.

1984 मध्ये डिंपल आणि राजेश खन्ना विभक्त झाले. परंतू, त्यांनी घटस्फोट घेतला नाही. 1992 साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले.

आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा जूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘नमक हराम’, ‘रोटी’, ‘सौतन’, ‘अवतार’ असे अनेक हिट चित्रपट देऊन त्यांनी मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली. राजेश खन्ना यांचे निधन 18 जुलै 2012 रोजी झाले, त्यांना विनम्र अभिवादन.