राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार : गिरीष महाजन

नागपूर : ‘राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसेच अशा डॉक्टरांना कायद्यानुसार अधिकाधिक कडक शिक्षा कशी करता येईल, यासाठी कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल’, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मंत्री महाजन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, बोगस डॉक्टर शोधण्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समिती आहेत. त्या समिती सदस्यांना नियमित बैठका घेऊन त्यांना कार्यक्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात येतील. सध्याच्या कायद्यानुसार या प्रकरणात सापडलेले बोगस डॉक्टर कायद्यातील तरतुदीचा लाभ घेऊन सुटतात. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना कडक शिक्षा देण्याबाबत कायद्यात कडक तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.

याशिवाय, जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टर येत्या काळात उपलब्ध होतील. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामीण आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पूर्णवेळ डॉक्टर्स उपस्थित राहतील, याबाबतही सूचना देण्यात येतील, असे मंत्री  महाजन यांनी सांगितले.