अंबाजोगाई : युवासेनेचे तालुकाप्रमुरव अक्षय भुमकर यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अक्षय भुमकर यांच्यावर येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षय भुमकर यांची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे.
अंबाजोगाई येथील युवासेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय भुमकर यांनी काल रात्री दहा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब मित्रांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने येथील ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी सांगितले.
या संदर्भात अक्षय भुमकरने यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना एक निवेदन लिहीले असून या निवेदनात त्यांनी युवासेनेचे विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, अक्षय भुमकर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त रात्री उशिरा शहरात पसरले आणि पहाटेपासून अक्षय भुमकर यांच्या चाहत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज बीडचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. सुनिल धांडे यांनी अक्षय भुमकर यांच्या तब्येतीची विचारपूस करुन डॉ. राकेश जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिंवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुकाप्रमुरव मदन परदेशी, केज तालुकाप्रमुरव शिंदे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, माजी उपनगराध्यक्ष अशोक हेडे आदी उपस्थित होते.
या संदर्भात विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता निवेदनात करण्यात आलेल्या दावे खोइन काढले आहेत. अक्षय भुमकर यास आपण केवळ कामाच्या देखरेखीसाठी ठराविक रक्कम ठरवून ठेवले होते. वास्तविक कामाच्या व कामाच्या बिलाचा त्याचा प्रत्यक्ष संबंध नसल्याचे सांगितले. अक्षय भुमकर यास ठरवलेल्या रकमेपैकी जवळपास 80 टक्के रक्कम आपण त्यास देवू केली असल्याचे सांगितले आहे.