नागपूर : ‘महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022’ हे नवीन लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत कोणत्याही चर्चेविना आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या अनुपस्थितीत एकमताने मंजूर करण्यात आलं.
या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टाचाराच्या घटनेवर लोकायुक्त थेट कारवाई करू शकणार आहेत. कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी केंद्रीय लोकायुक्त कायद्याप्रमाणेच निकष ठरवण्यात आले आहेत.
या कायद्याअंतर्गत आमदारांच्या संदर्भात अध्यक्षांना आणि मंत्र्यांच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार देण्यात आले आहेत. हे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. तसंच लोकपाल कायद्यासारखे लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.