कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘स्वाराती’ सज्ज : 150 खाटा राखीव – डॉ. भास्कर खैरे

अंबाजोगाई : कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाराती’ रुग्णालयाने पुर्ण तयारी केली असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

कोविडच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या शासकीय तसंच खासगी रुग्णालयांमध्ये कोविड व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा सराव घेण्यात आला. देशभरात सर्वत्र आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा ‘मॉकड्रील’ मधून आढावा घेण्यात आला. अंबाजोगाई इथं ‘स्वाराती’ रुग्णालयातही सराव चाचणी घेण्यात आली.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे..

यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. भास्कर खैरे म्हणाले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘स्वाराती’ रुग्णालयाने पुर्ण तयारी केली आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी 150 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील 30 खाटा आयसीसीयुच्या राखीव असणार आहेत. प्रत्येक खाटेला सेन्ट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून दोन एलएमओ टॅंक सुसज्ज आहेत. या शिवाय तीन लिक्विड ऑक्सिजनचे टॅंक आमच्याकडे आहेत, दोन पीएसऐ प्लॅन्ट आहेत. 800 ऑक्सिजन सिलेंडर आम्ही नेहमीसाठी भरुन तयार ठेवले आहेत. याचबरोबर रुग्णाला लागणारी औषधे, पीपीई कीट्स आणि कोरोनाची टेस्ट करण्याची लॅबही आमची सुसज्ज आहे. रोज 300 ते 400 टेस्ट यातून केल्या जाऊ शकतात. त्यासाठी 8 हजार टेस्ट कीट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी 50 तज्ञ डॉक्टरांची टीम आणि सोबत परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ आम्ही तयार ठेवला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोविडचा सामना करण्यासाठी आम्ही पुर्ण तयारी केली आहे, असे डॉ. खैरे यांनी सांगितले. 

पुढे बोलताना डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले की, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वेळोवेळी सॅनिटाइजरचा उपयोग करणे याची प्रत्येकाने वेळोवेळी दक्षता घेतली तर कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल, असेही अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.