75 रुपये पहिलं मानधन, ‘भाईजान’ सलमान खानचा 58 वा वाढदिवस, स्टाईलचे करोडो लोक दिवाने

टीम AM : बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खानला बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू करून आता 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, आजही त्याच्या स्टाईलचे करोडो लोक दिवाने आहेत.

सलमान खानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर शहरात झाला. त्याचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान आहेत. सलमानचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. सलमान खानला अरबाज आणि सोहेल खान हे दोन भाऊ, तर, अलविरा आणि अर्पिता या दोन बहिणीही आहेत.

सलमान खान हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखकाचा मुलगा असला तरी त्याने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘बीवी हो तो ऐसी’ हा सलमान खानचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती. इतकेच नाही तर, या चित्रपटासाठी त्याला अवघं 75 रुपये मानधन मिळालं होतं. यानंतर सलमानकडे बरेच दिवस काम नव्हते आणि त्यानंतर अचानक त्याचे नशीब चमकले.

सलमानला सूरज बडजात्याच्या रोमँटिक चित्रपट ‘मैंने प्यार किया’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री झळकली होती. या चित्रपटाने सलमान खान याची कारकीर्द एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. दोघांच्या या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर असा धुमाकूळ घातला की, सर्वांनाच त्यांचे वेड लागले होते. सलमानचा हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. यासाठी सलमान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता.

बॉलिवूडच्या या ‘दबंग’ अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत असते. कधी ‘हिट अँड रन’ प्रकरणात, तर कधी काळवीट शिकार प्रकरणात भाईजानला तुरुंगात देखील जावे लागले आहे. पण असे असूनही त्याच्या लोकप्रियतेत किंचितशीही घट झाली नाही. पहिल्या चित्रपटासाठी अवघे 75 रुपये घेतलेला सलमान खान आजघडीला कोट्यवधींची कमाई करतो.

‘मैने प्यार किया’, ‘सनम बेवफा’, ‘साजन’, ‘हम आपके है कौन’, ‘करण अर्जुन’, ‘जुडवा’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बीवी नंबर वन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’, ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा’ है’, ‘दबंग 2’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘रेस’, ‘राधे’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.