नवी दिल्ली : जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, यासाठी आज देशभरात सराव चाचणी करण्यात येणार आहे.
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये हा सराव करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. या सरावामध्ये संबंधित अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उपलब्धता, खाटांची क्षमता, डॉक्टर्स, परिचारक आणि निम – वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ, अद्ययावत आणि मूलभूत जीवनावश्यक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, चाचणी क्षमता आणि वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता यांची तयारी पाहिली जाणार आहे.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करुन हा सराव करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.