घाटनांदूर : रासायनिक खतांच्या होत असलेल्या अतिवापरामुळे शेती नापीक होत चालली आहे. शेती नापीक होण्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे मत अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने यांनी व्यक्त केले. त्या घाटनांदूर येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 1) येथील शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने, मोरे, कृषी विस्तार अधिकारी सुपेकर यांनी भेट दिली. बहूपीक पद्धती, नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रयोगशील शेती करा तसेच रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा, असे मत श्रीमती दिवाने यांनी मांडले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने हे अभियान 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतची कारणमीमांसा योग्य पध्दतीने व्हावी आणि ती प्रशासनाच्या लक्षात यावी, यासाठी कोरडवाहू, डोंगराळ तसेच आदिवासी सामाजिक दुर्बल भागात हे अभियान राबविण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने, सहाय्यक ग. वि. अधिकारी प्रवीण मोरे व कृषी विस्तार अधिकारी कन्हैय्या सुपेकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भरपूर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड केली होती, त्यामुळे जमिनीला हवी तेवढी विश्रांती मिळाली आणि खरीप हंगामातील त्या जमिनीवरील पिके म्हणावी तशी चांगली उगवली नाहीत. जमिनीला विश्रांती द्या, आलटून पालटून पिके घ्या, एकच पीक वारंवार घेऊ नका, तरच उत्पादनात वाढ होईल, अशी माहिती मोरे यांनी दिली. तर कृषी विस्तार अधिकारी कन्हैय्या सुपेकर यांनी शेतकऱ्यांना पोकरा, महाडीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ कसा मिळू शकतो, याबद्दल सविस्तार माहिती दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, चार – पाच जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांनी गोबरगॅस प्लॅन्ट करून त्याचा वापर करणे फायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच रासायनिक खते आणि औषधांच्या अतिवापरामुळे शेतीतील अन्न – धान्य विषारी बनत चालले आहे. त्यामुळे माणसांना भयानक आजारांची लागण होत आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर कमी करून जैविक औषधांचा वापर करावा तसेच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे.
यावेळी या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण मोरे, कृषी विस्तार अधिकारी कन्हैय्या सुपेकर यांच्यासह येथील सरपंच ज्ञानोबा जाधव, ग्रामविकास अधिकारी महेश फड, पत्रकार धनंजय जाधव, गणेश जाधव प्रयोगशील शेतकरी रामभाऊ वैद्य, प्रगतशील शेतकरी नरसिंग जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख, उत्सव जाधव तसेच महिला बचत गटाचे येथील प्रभाग समन्वयक कदम सर, तालुका सेंद्रिय शेती व्यवस्थापक दहिरे सर, प्रभाग व्यवस्थापक श्रीमती चांगिरे, श्रीमती इंगळे आणि शेतकरी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.