कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी अदर पूनावाला, बिल गेटस् यांना नोटीस

राज्य सरकारलाही मुंबई उच्च न्यायालयानं बजावली नोटीस

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला, बिल गेटस् आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. कोविशिल्डची लस पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा काही दुष्परिणाम होत नाही, म्हणून डॉ. स्नेहल लुणावत या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीनं मागील वर्षी 28 जानेवारीला कॉलेजमध्ये कोविशिल्ड लस घेतली, त्यानंतर 1 मार्चला या तरुणीचा मृत्यू झाला होता.

या तरुणीचे वडील दिलीप लुणावत यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

लुणावत यांनी नुकसान भरपाई म्हणून सिरम कंपनीवर एक हजार कोटी रुपयांचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी गुगल, युट्यूब, मेटा सारख्या कंपन्यांनी लसीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे लपवून ठेवल्याच सांगत त्यांच्या विरुध्दही केंद्राने कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.