हृदयद्रावक : पिण्याचे पाणी भरण्याच्या धडपडीत शॉक लागल्याने मुलीचा मृत्यू : मिलिंदनगर भागातील घटना

अंबाजोगाई : अंबाजोगाईत ऐन सणासुदीच्या काळात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नळाला आलेलं पिण्याचे पाणी भरण्याच्या धडपडीत एका मुलीला विद्युत शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील मिलिंदनगर (गवळीपुरा) भागात ही घटना दिनांक 3 सप्टेंबरला सायंकाळी घडली असून प्राजक्ता किशन गायकवाड (वय18) असं सदरिल मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे मिलिंद नगर भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या पाणी पुरवठ्याच्या नियोजनाला आणि महावितरणच्या खंडित वीज पुरवठ्याला अंबाजोगाईकर कंटाळले असून दोन्ही यंत्रणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अंबाजोगाई शहरातील पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचं संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासियांना 10 ते 12 दिवसांची वाट बघावी लागते. उन्हाळा, पावसाळा अगदी धरणं भरलं असतानाही ही समस्या बिचाऱ्या अंबाजोगाईकरांची ‌‌‌‌‌‌सूटली नाही. शहरातील एखाद्या गल्लीत पाणी आले की, सर्व कामं सोडून लोकं पाणी साठवून ठेवण्यासाठी धडपड करत असतात. कारण त्यांना माहित आहे, नगरपरिषद पाणी सोडण्याचे दिवसं कमी नाही पण जास्त मात्र करुं शकते. पिण्याचे पाणी भरण्यासाठी धडपड करत असतानाच काल शहरातील मिलिंदनगर (गवळीपुरा) भागातील प्राजक्ता गायकवाड या मुलीचा मृत्यू झाला आहे, मन सुन्न करणारी ही घटना आहे. 

मयत प्राजक्ता गायकवाड या मुलीचे वडील मोंढ्यांत हमालीचं काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या तीन – चार दिवसांपासून वीजेचा सतत लपंडाव सुरू आहे. त्यात 10 ते 12 दिवसाला नळाला पाणी येत असल्याने दिनांक 3 सप्टेंबरला मुलगी प्राजक्ता ही रात्री 8 वाजताच्या दरम्यान अवेळी नळाला पाणी सुटल्याने पाणी भरण्यासाठी बाहेर जात असताना घराबाहेरील विद्युत खांबाला हात चिकटून तिला जोराचा शॉक लागला. तिला तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राजक्ताचा अर्ज राहिला तसाच

शांत,‌ नम्र, मनमिळाऊ प्राजक्ता आई – वडील मोलमजुरीला गेल्यानंतर दिवसभर घरातील काम करत लहान भावाची देखभाल करायची. प्राजक्ता शिवणकाम करत कुटूंबाला हातभार लावत असे. नुकताच तिने आयटीआयला शिवणकाम शिकण्यासाठी अर्ज दिलेला होता, सोमवारी तिला बोलावले होते. तिचे शिवणकामाचे शिक्षण घेऊन आपला मोठा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न या दुर्घटनेमुळे भंगले आहे.