हर्नियाच्या ऑपरेशनसाठी मच्छरदाणीच्या जाळीचा वापर : डॉ. नितीन चाटे यांचा यशस्वी प्रयोग
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जरी विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असुन हर्नियाच्या ऑपरेशनसाठी मच्छरदाणीची जाळी वापरण्याबाबत विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या संशोधनाची दखल प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय वैद्यकशास्त्र नियतकालिक ‘क्युरीयस’ यांनी शोधप्रबंध प्रसिद्ध करुन घेतली आहे.
ग्रामीण भागातील आशिया खंडांतील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या ‘स्वाराती’ रुग्णालयातील शल्यचिकीत्सा विभाग हा उपक्रमशील विभाग म्हणून ओळखला जातो. विविध उपक्रमांसह महात्मा फुले योजनेत राज्यभरात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग, अशी ओळख विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांच्या कृतीशीलतेने निर्माण झाली आहे.
हर्निया या आजारावर उपचारांकरीता खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या 1200 ते 2000 रुपये किंमतीची जाळी ही या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकरीता मोठी खर्चिक बाब ठरत असल्याने अनेक रुग्ण बिगरजाळीच्या शस्त्रक्रियेचा पर्याय निवडत असत. बिगरजाळीच्या टाक्यांच्या शस्त्रक्रीयेमुळे रुग्णांना अनेक महिने त्रास होऊ शकतो व पुन्हा हर्निया होण्याचा वाढीव धोका असतो.
यावरील पर्यायांचा शोध घेत असताना डॉ. नितीन चाटे यांचे लक्ष दोंडाईचा येथील डॉ. रविंद्र टोनगावकर यांसह जगभरातील विविध अल्पविकसीत देशांमधील सर्जन वापरत असलेल्या मच्छरदाणीच्या जाळीच्या उपयुक्ततेकडे गेले. जगभरात यशस्वी झालेला हा स्वस्त आणि स्वस्थ पर्याय रुग्णांना नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय डॉ. नितीन चाटे यांनी घेतला.
बाजारात लोकप्रिय असलेली हर्नियाची जाळी पॉलिप्रॉपीलीन या केमिकल नावाची असते तर मच्छरदाणी ही पॉलीइथिलीन या शास्त्रीय नावाची. पॉलीप्रोपीलीनच्या हर्निया जाळीची किंमत 1200 ते 2000 रुपये इतकी असुन दुसरीकडे ‘स्वाराती’ येथील संशोधनामध्ये वापरलेली पॉलीइथिलीन मच्छरदाणीची जाळी अवघ्या 12 रुपयांहुन कमी किंमतीत तयार करुन वापरता येते. अशा प्रकारची जाळी वापरुन 2018 पासुन आजपर्यंत तब्बल 1000 हुन अधिक हर्निया शस्त्रक्रिया करण्यात आल्या असुन याची दखल नुकतीच ‘क्युरीयस’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकीत मॅगझीनमध्ये डॉ. नितीन चाटे यांचा या विषयावरील शोधप्रबंध प्रसिद्ध करुन घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रयोगामुळे रुग्णांना कुठलाही त्रास झालेला नसुन 95 टक्के रुग्ण समाधानी असल्याचे या प्रबंधातुन समोर आले आहे. या संशोधनासाठी डॉ. नितीन चाटे यांच्या नेतृत्वामध्ये डॉ. भुषण जोगदंड, डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे व डॉ. महेश बिराजदार यांनी संशोधन सहाय्यक म्हणुन काम केले.
ग्रामीण भागातील या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रातील दखल ही स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालयाकरिता अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या जाळीच्या वापरामुळे एकीकडे शासनाची तब्बल 20 लाख रुपयांची महसुल बचत झाली असुन दुसरीकडे महात्मा ज्योतीराव फुले जनारोग्य योजनेतुन या प्रकारच्या हर्निया सर्जरींमधून 85 लाख रुपयांचा महसुल शासनास प्राप्त झाला आहे, अशी माहिती शल्यचिकीत्सा शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन चाटे यांनी दिली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह डॉ. सिद्धेश्वर बिराजदार ,डॉ. शंकर धपाटे, डॉ.राजेश कचरे, डॉ. दिपक लामतुरे, डॉ. चौधरी आदींनी सर्जरी विभागाच्या डॉ. नितीन चाटे यांसह डॉ. जोगदंड, डॉ. नागरगोजे व डॉ. बिराजदार यांचे अभिनंदन केले आहे.