टीम AM: गणेशोत्सवाला आज सर्वत्र उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झाला. शहरात ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वर्षी गणेश भक्तांमध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. दरम्यान, अंंबाजोगाईत यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठमोठ्या गणेश मूर्ती आणल्याने पुुणे – मुंबईचा फील येेेत होता. या सुुंदर व आकर्षक मुर्ती अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधून घेत होत्या.
अंबाजोगाई शहरात सकाळच्या सुमारास घरोघरी गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य चौकांतून विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत – गाजत घेऊन येत होते. ढोलांचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन होताना दिसून येत होतं. बाप्पाच्या आगमनाचं हे विलोभनीय चित्रं अंबाजोगाई शहरातील सर्वच भागात पहायला मिळतं होतं. मोठ्या भक्तिभावाने शहरातील विविध भागांतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शहरातील मुख्य चौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी जागोजागी पोलिस तैनात केले होते. शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेत संपूर्ण यंत्रणा सक्षमपणे कामाला लावली होती.