अंबाजोगाई : कर्जमाफीने शेतकऱ्यांचे ‘सिबील’ खराब झाले असल्याचे सांगून शेतीपुरक व्यवसाय कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँका नकार देत आहेत. असा अनुभव घेतलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम व्यंकटराव चाटे यांनी उपजिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन दिले असून शेतकऱ्यांना अपात्र यादीतून वगळून शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम व्यंकटराव चाटे यांनी दिलेल्या निवेदनातून स्वतःचा अनुभव कथन केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकारने फसवणूक केल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत चाटे यांनी एका महत्त्वाच्या विषयाकडे समाजाचे लक्ष वेधले आहे.
ते आपल्या निवेदनात म्हणतात की, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवणूक आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. त्यावेळी माफीस पात्र शेतकऱ्यांचे फक्त शेती निगडीत कृषी कर्ज माफ करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे.
म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे 10 रूपयापासून ते दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले असे 15 हजार, 25 हजार, 35 हजार, 40 हजार, 50 हजार 60 हजार, 70 हजार, 80 हजार, 90 हजार ते दीड लाख, 2 लाख माफ केले. मात्र त्याच कर्जमुक्त शेतकऱ्यांना त्यांचे ‘सिबिल’ खराब म्हणून काळ्या यादीत नावांची नोंद केली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना शेती निगडीत जोड धंदे करण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.