टीम AM : हिंदी चित्रपट सृष्टीतील महान गायक मुकेश यांचा आज (27 ऑगस्ट) स्मृतीदिन. मुकेश यांचे खरं नाव मुकेशचंद माथुर पण त्यांच्या घराण्याने माथुर हे आडनाव काढून टाकून त्याचं नाव हेच आडनाव म्हणून धारण केलं. 22 जुलै 1923 साली त्यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच गाणी आणि अभिनयाची आवड होती.
एल. सैगल हे त्यांचे आदर्श होते या बाबतीत. मोतीलाल या त्याकाळाच्या अभिनेत्याने मुकेश यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नात गाताना ऐकले. त्यांनीच मुकेश यांना मुंबईला येण्यास सांगितले. मुकेश यांना सुरुवातीच्या त्या काळात मोतीलाल यांची खुप मदत झाली.
1941 साली त्यांनी निर्दोष या चित्रपटाद्वारे अभिनेता – गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. पण खऱ्या अर्थाने त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली ती 1945 ला ‘पहली नजर’ या चित्रपटातील दिल जलता है.. ह्या गाण्यापासून. हे गाणं लोकांना खुप आवडलं आणि मुकेश रातोरात स्टार झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही.
मुकेश यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यांना चार वेळा फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक हा पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणूनही त्यांनी मल्हार, आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली. त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट. कारण पुढे या जोडीने आवारा, बरसात, श्री 420, अनाडी, जिस देश में गंगा बहती है, संगम, मेरा नाम जोकर यांसारख्या सिनेमाद्वारे काय इतिहास रचला ते आपल्या सगळ्याना माहिती आहेच.
राज कपूर यांच्या यशात काही वाटा मुकेश यांच्या गाण्याचाही होता, हे कोणीही अमान्य करणार नाही. त्यांनी दुख – सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण, दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले. पण ते अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत.
मुकेश यांनी अभिनयासाठी काही काळ गायनही बाजूला ठेवले होते, पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ मधील गाणे कई बार यू हीं देखा… साठी मुकेश यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुकेश यांचे 27 ऑगस्ट 1976 रोजी निधन झाले. मुकेश यांना विनम्र अभिवादन.
प्रफुल्ल गायकवाड