अंबाजोगाईत दहिहंडीचा थरार : ‘गोविंदा आलारे’ च्या जयघोषात गोविंदा पथकाने फोडली दहिहंडी, तरुणांचा जल्लोष

बाळा गायके मित्र परिवाराचे आयोजन

अंबाजोगाई : दहिहंडीचा थरार अंबाजोगाईकरांना काल पहायला मिळाला. ‘गोविंदा आलारे’ च्या जयघोषात जय मल्हार गणेश मंडळाच्या गोविंदा पथकाने शहरातील मानाची दहिहंडी फोडली. यावेळी गोविंदा पथकात उत्साह दिसून येत होता. जोषपूर्ण गाण्यावर ठेका धरत तरुणांनी दहिहंडीत जल्लोष केला. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

शहरात दोन वर्षांच्या कालांतराने वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात बाळा गायके मित्र परिवार यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या आठ वर्षांपासून शहरात बाळा गायके मित्र परिवारांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. 

दहीहंडी फोडण्यासाठी शहरातील सहा वेगवेगळ्या गोविंदा पथकाने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला होता. ‘गोविंदा आला रे’ या जयघोषात गाण्याच्या तालावर युवकांनी ठेका धरत चार ते पाच थराचे मानवी मनोरे लावत दहीहंडी फोडली.

यावेळी अक्षय मुंदडा, माजी नगरसेवक सारंग पुजारी, माजी उपसभापती तानाजी देशमुख, बिबीशन चाटे, पत्रकार अतुल जाधव, युवासेना जिल्हाउपाध्यक्ष विनोद पोखरकर, डॉ. सुधीर धर्मपात्रे, बालासाहेब पाथरकर, अशोक हेडे, शंतनू लोमटे, राहुल देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळा गायके यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण भालेकर यांनी मानले. दहीहंडी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाळा गायके मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी शहरातील युवकांची, महिलांसह बालगोपालांची मोठ्या संख्येने गर्दी होती.