कायदेशीर किरायादार असतानाही दुकान पाडून नुकसान केले, कपाटातील ‌‌‌‌‌‌रक्कमही चोरली

मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या व्यथा

पोलिस ठाण्यात दिली तक्रार

अंबाजोगाई : कायदेशीर किरायादार नात्याने ताब्यात असलेले दुकान अनाधिकृतपणे पाडून त्यातील असलेला माल रस्त्यावर फेकून दिला आणि दुकानाच्या कपाटातील रक्कमही चोरुन नेली, असं मोढ्यांतील व्यापारी श्रीराम सुधाकर रत्नपारखी, राहुल जयकुमार कांबळे आणि अर्जुन नरसिंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुकान पाडणाऱ्या आणि रक्कम चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत सदरिल व्यापाऱ्यांनी केली आहे.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मोढ्यांतील व्यापारी श्रीराम सुधाकर रत्नपारखी, राहुल जयकुमार कांबळे आणि अर्जुन नरसिंग पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. 

या संदर्भात रितसर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हणटलं आहे की, शहरातील मोंढा परिसरात स.न. 610 मध्ये एका व्यापाऱ्याच्या मालकीची अंदाजे 1 एकर जागा आहे. सदर जागेत त्याचे राहते घर असून पुर्व – पश्चिम – दक्षिण बाजूस मोकळी जागा होती. या मोकळ्या जागेत पुर्वेच्या बाजूला असणारी 10-20 ची जागा सदरिल व्यापाऱ्याच्या वडिलांनी सुधाकर रत्नपारखी यांना 50 वर्षांपूर्वी किरायानं दिली होती. सदरिल जागेत बांधकाम करुन त्यांनी जगदीश क्लॉथ सेंटर या नावाने कपड्याचा व्यवसाय सुरू केला. 

दरम्यानच्या काळात सदरिल व्यापाऱ्याच्या घरात वाटणी झाल्यानं सदरिल जागा त्यांच्या मुलाच्या‌ ताब्यात आली. व्यापाऱ्याच्या मुलानं या जागेसाठी सुधाकर रत्नपारखी यांच्या विरुद्ध दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) अंबाजोगाई यांच्या न्यायालयात दि. दा. 30/2003 ताबा मिळण्यासाठी दावा केला होता. सदर दाव्यामध्ये समजपत्र होवून त्यांनी सुधाकर रत्नपारखी यांचा किरायदार नात्याने असलेला ताबा मान्य केला आणि पुढेही तो कायम राहील, असे मान्य केले आहे. सुधाकर रत्नपारखी यांचं 2015 ला निधन झालं आणि सदरिल दुकानाचा कारभार श्रीराम रत्नपारखी पाहतात. त्यांच्या विरोधातही ताबा मिळण्यासाठी सदरिल व्यापाऱ्याच्या मुलानं दिवाणी न्यायालयात 221/2015 नुसार दावा दाखल करण्यात आला असून तो न्यायालयात प्रलंबित आहे.

सदरिल दुकानावर किरायदार‌ या नात्याने कायदेशीर ताबा असतानाही 19 ऑगस्ट 2022 ला रात्रीच्या सुमारास सदरिल व्यापाऱ्यांनी जेसीबी मशिनने ताब्यात असलेले दुकान पाडले आणि दुकानातील माल रस्त्यावर फेकून दिला. यात कपाटाचे आणि शटरचेही नुकसान केले आणि दुकान खाली करण्याची धमकी दिली, अशी माहिती श्रीराम सुधाकर रत्नपारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशीच हकीकत राहुल जयकुमार कांबळे आणि अर्जुन नरसिंग पाटील यांचीही आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत श्रीराम सुधाकर रत्नपारखी, राहुल जयकुमार कांबळे आणि अर्जुन नरसिंग पाटील यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.