आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपसोबत लढविणार
अंबाजोगाई : बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांना अभिप्रेत अशी युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. आमची शिवसेना (शिंदे गट) भाजपसोबत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजपसोबत लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली.
शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आज अंबाजोगाई येथे पार पडला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी (दि.20) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख अर्जून वाघमारे, जिल्हा संघटक अशोक गाढवे, युवा उपजिल्हाप्रमुख डॉ. अभिजीत भालेकर, शिवसेना नेते पंजाब देशमुख आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
सचिन मुळूक म्हणाले, भाजप -शिवसेना ही युती कार्यकर्त्यांना अपेक्षित होती. तीच युती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थापन झाल्याने आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत. आजही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी – काँग्रेसशी साथ सोडल्यास त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे. आम्ही शिवसेनेतच असून स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे यांना अपेक्षित असलेले कार्य आम्ही पुढे नेत आहोत.
आमचे समाजकार्य सुरुच आहे. परंतु निवडणुकीत अल्पमते मिळतात. त्याची कारणे शोधण्याची गरज असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार दौरा करत आहोत. येत्या काळात जनमत हे आमच्या सोबत राहील, असे कार्य करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीची जनभावना ओळखून मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकारी, शिवसैनिकांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकांचा पक्षप्रवेश
अंबाजोगाई तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिंदे गटात पक्षप्रवेश केला. यामध्ये माजी तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, गटप्रमुख, शाखा प्रमुख अशा 25 पदाधिकार्यांनी पक्षप्रवेश केला.