अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याला मर्यादा येत चालल्या आहेत : ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे

10 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

अंबाजोगाई : अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य खुले असायला हवे, मात्र या स्वातंत्र्याला मर्यादा येत चालल्या आहेत, अशी खंत 10 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे यांनी व्यक्त केली.

10 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या सुर्यकांत गरुड व्यासपीठावर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, त्यांच्या सुविद्दपत्नी उर्मिला वैद्य, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, मावळते संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीहरी नागरगोजे, सत्कारमुर्ती अमर हबीब, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, मसाप कार्यकारिणीचे सदस्य डॉ. राहुल धाकडे, अमृत महाजन, प्रा. कावळे, रेखा देशमुख, निशा चौसाळकर यांच्यासह आदी  उपस्थित होते.

आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. दिलीप घारे यांनी  अंबाजोगाई शहरात घालवलेल्या बालपणाच्या आठवणीपासुन नाट्यक्षेत्राकडे ओढल्या गेल्यापर्यंतच्या प्रवासाचा धांडोळा घेतला. ज्या परिसरात त्यांनी आपले बालपण घालवले, त्या खडकपुरा, देशपांडे गल्लीतील प्रवासासह आईकडुन मिळालेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा हा आपल्या जीवनातील वाटचालीत महत्त्वपुर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करुन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आपण शिक्षण घेण्यासाठी गेलो आणि तेथुन खऱ्या अर्थाने आपला रंगमंचावरील प्रवास सुरू झाला, असे त्यांनी सांगितले. याची सर्व प्रेरणा प्रा. डॉ. केशव देशपांडे यांनी आपल्याला दिली, असा आवर्जून उल्लेख ही त्यांनी केला.

प्राणीशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी घेवून नाट्यशास्त्रात अध्यापन करणारा एकमेव प्राध्यापक असल्याचेही त्यांनी सांगून बेगडी दुनियेतुन वास्तव्याच्या दुनियेत येण्यासाठी अनिवासी अंबाजोगाईकरांनी एकदा अंबाजोगाईला यायलाच हवं, असं त्यांनी सांगितले. या -हदयस्पर्शी संमेलनाचे उद्घाटक म्हणून आपल्याला बोलावल्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले.

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, लेखक अमर हबीब यांना मंदा देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार, प्रा. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावर स्मृती शिक्षक लेखन पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सागर कुलकर्णी, प्रा. संतोष मोहिते संकलित ‘शब्दार्णव’ (कविता संग्रह) अमर हबीब, दगडू लोमटे संकलित ‘नातीला पत्र’, ‘दशकधारा’, दगडू लोमटे लिखित काव्यसंग्रह ‘पांगलेल्या प्रार्थना’, संमेलनाध्यक्ष दासू वैद्य लिखित ‘चष्मेवाली’, ‘झुळझुळ झरा’, ‘गोलमगोल’, ‘क कवितेचा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. दासू वैद्य यांनी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचा गेल्या दहा वर्षांपासून चालु असलेला हा ज्ञानयज्ञ सतत चालू ठेवल्याबद्दल सर्व संयोजकांचे कौतुक व्यक्त करीत आजपर्यंत झालेले 9 अध्यक्षांनी साहित्यात आपला वेगळेपणा जपत साहित्याचा ठसा उमटवला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दासू वैद्य यांनी माजी संमेलनाध्यक्ष प्रा‌. रंगनाथ तिवारी, प्रा‌ शैला लोहिया, गणपत व्यास, प्राचार्य संतोष मुळावकर, डॉ. श्रीहरी नागरगोजे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या सोबत अंबाजोगाईमध्ये घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला. 

जन्मगाव हे जन्मावर ठरवायचं का कर्मावर ठरवायचं यांच्यावर तोडगा काढायचा ठरवला तर तो त्याच्या कर्मावर ठरवला गेला पाहिजे. माझा जन्म अंबाजोगाईत झाला नसला तरी अंबाजोगाई हे माझे कर्मगाव आहे आणि हे सांगताना मला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. 

प्रा. दासू वैद्य यांनी अंबाजोगाई येथील आपल्या महाविद्यालयीन शिक्षणात अनेक साहित्यीकांचा सहवास करण्याची, त्यांना जवळुन पाहण्याची, अभ्यासण्याची संधी मिळाली आणि आपण नकळत साहित्याकडे वळत गेलो. या सर्व जडणघडणीत अंबाजोगाई येथील साहित्य निकेतन या ग्रंथालयाचे फार मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

गेली 10 संमेलनातुन गावातील साहित्याचा आणि साहित्यिकाचा जागर चालु ठेवण्याचे काम हे असेच अखंडपणे सुरु रहावे, अशा सदिच्छा दिल्या व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या सुरेख कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांना केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मसापचे सचिव कवी गोरख शेंद्रे यांनी मानले. या संमेलनासाठी अंबाजोगाई पंचक्रोशीतील सर्व स्तरांतील नागरिकांची उपस्थिती होती.