पुरातन योगेश्वरी मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळावा
अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज दिनांक 19 ऑगस्टला अंबाजोगाईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील योगेश्वरी देवी मंदिरास भेट देऊन योगेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते राज्यपाल महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंदिराच्या ट्रस्टींनी देवीचा फोटो व शाल देऊन राज्यपाल महोदय यांचा सत्कार केला.
मंदिर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरिधारी भराडिया, सचिव ॲड. शरद लोमटे, सदस्य डॉ. संध्या जाधव, राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा, प्राध्यापक अशोक लोमटे, पूजा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार पार पडला.
याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले. पुरातन योगेश्वरी मंदिराच्या विकासासाठी निधी व शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी याद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार बिपीन पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.