रसिकांच्या पाठबळावरच गावचे 10 वे ‘अंबाजोगाई साहित्य संमेलन’

संमेलनात ठराव नाही तर होते संकल्पसिद्धी 

शहरातील साहित्यप्रेमींकडून 100 रुपये स्वागत शुल्क जमा करत निधी जमवून केवळ रसिकांच्या राजाश्रयावरच अंबाजोगाईत 10 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन 19 ते 21 ऑगस्ट या दरम्यान होत आहे.

आद्यकवी मुकुंदराज, संतकवी दासोपंत यांचा वारसा लाभलेल्या आणि योगेश्वरी देवीमुळे प्रसिद्ध असलेलं अंबाजोगाई हे तालुक्याच ठिकाण व प्राचीन मंदिराच शहर. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्याचे केंद्रही अंबाजोगाईच होते. स्वातंत्र्य पूर्वकळपासून म्हणजे 1818 साली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी अंबाजोगाईत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. परिणामी सांस्कृतिक, साहित्यिक व नाट्य क्षेत्रात अंबाजोगाईचा लौकिक कायम राहिला. म्हणूनच मराठवाड्याचं पुणे म्हणून अंबाजोगाईला संबोधले जाते. या गावाचा सांस्कृतिक, साहित्यिक, लोककला,भाषा आदींचा वारसा या गावातील लोकांनी जपलेला आहे.

यावर्षी 29 ऑगस्ट 2022 रोजी मराठवाडा साहित्य परिषद ,शाखा अंबाजोगाईचे 10 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन होत आहे. यावेळी ‘अनिवासी अंबाजोगाईकर’ या संकलपनेवर असून प्रा. डॉ. दासू वैद्य हे संमेलनाध्यक्ष तर प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी हे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचे वैशिष्ठ्य म्हणजे कोणतीही देणगी किंवा सरकारी मदत न घेता, लोकसहभागातून साहित्यिक, रसिक, साहित्यप्रेमी यांच्याकडून स्वागत सन्मान निधी जमा करून हे संमेलन रसिकांच्या पाठबळावर साजरे केले जाते. गेल्या दोन दशकांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी गावचे दर्जेदार असे 9 साहित्य संमेलन झाले. हे दहावे आज होत आहे.

प्रत्येक पिढीतील साहित्यिकांनी येथील परंपरा, संस्कृती आणि साहित्य जपण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजही साहित्य संमेलन ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. 25 वर्षा पूर्वी या संमेलनाची सुरुवात लोकसहभागातून झाली, उद्देश एवढाच की येथील साहित्य, कला व संस्कृती जतन झाली पाहिजे. नवीन साहित्यिकांना प्रोत्साहन मिळायला हवे.

हा दृष्टीकोन समोर ठेऊन 1996 साली प्रा. रंगनाथ तिवारी, डॉ. श्रीहरी नागरगोजे, प्रा. नानासाहेब गाठाळ आणि अमर हबीब या चौघांनी अंबाजोगाई साहित्य संमेलन घेण्याचा नवा पायंडा सुरू केला. तो आजही कायम आहे. प्रारंभी प्रत्येकी दोन दोन हजार रुपये चौघांचे जमा केले. डॉ. श्रीहरी नागरगोजे यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले आणि प्रा. रंगनाथ तिवारी हे संमेलनाध्यक्ष होते. राम मुकदम, डॉ. संतोष मुळावकर, गणपत व्यास, भालचंद्र मोटेगावकर आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. अशा प्रकारे या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. गावाचे संमेलन ही नवीन संकल्पना पुढे आली. पहिल्या संमेलनाच्या वेळी साहित्यिक, रसिक, कलाकार यांच्यातून स्वागत सभासद नोंदणी करून निधी गोळा केला. कुठलेही देणगी किंवा राजाश्रय न घेता जमतील तेवढ्या पैशातून संमेलन घ्यायच या विचाराने सर्वानुमते संमेलन पार पडलं. हा पहिल्या संमेलनापासून सुरु झालेला पायंडा पुढे कायम राहिला आणि बळकट होत गेला. यामुळे कोण एकाचा अंकुश किंवा मक्तेदारी न राहता, यातील प्रत्येकाच्या सहभागामुळे हे संमेलन प्रत्येकाला आपल वाटतं.

लोकसहभागातून होणारे, बहुभाषिक आणि गावचे संमेलन हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असेल. दर दोन वर्षांनी हे साहित्य संमेलन अंबाजोगाईत होत आहे. या वर्षी 10 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन होत असताना साहित्य प्रेमी, रसिक यांचा उत्साह आणि संमेलनाची उंची नक्कीच वाढलेली आहे. दुसरे वैशिष्ट्य अस की या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष यासाठी कधीच निवडणूक झाली नाही. मावळते संमेलनाध्यक्ष पुढील संमेलनाध्यक्ष याचं नाव सुचवतात. ते नाव मसाप कार्यकारणीत येते. जर सर्वांच एकमत झाल तरच त्या नावाची निवड होते. एक जरी मत कार्यकारिणीत विरोधात गेल तर या साठी निवडणूक प्रक्रिया होते. मसापचे सर्व आजीव सभासद आणि त्यात्या संमेलनाचे स्वागत सभासद हे मतदार असतात. परंतू, आजपर्यंत संमेलानाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घेण्याची गरज भासली नाही.

आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांच्या निवडणुका बंद करून अंबाजोगाई साहित्य संमेलनासारखी संमेलनाध्यक्षांची निवड करण्याची पध्दत स्विकारली जावी. असा पायंडा अंबाजोगाई ने निर्माण केला आहे. गावचे साहित्य संमेलन आणि तेही लोकसहभागातून ही अंबाजोगाई साहित्य संमेलनाची ओळख झाली आहे. या संमेलनाच वैशिट्य म्हणजे हे बहुभाषिक संमेलन आहे.

आणखीन एक वैशिट्य सांगता येईल या संमेलनात ठराव घेतले जात नाहीत, तर संकल्प केले जातात. हे सर्व संकल्प पूर्ण केले जातात. आजपर्यंत 9 साहित्य संमेलने पार पडली, प्रा. रंगनाथ तिवारी, प्रा. डॉ. शैला लोहिया रा. द. अरगडे, बलभीम तरकसे, प्रा. डॉ. संतोष मुळावकर, डॉ. श्रीहरी नागरगोजे, मंदाताई देशमुख, गणपत व्यास, प्रा. डॉ. कमलाकर कांबळे हे आतापर्यंत 9 संमेलनाचे संमेलानाध्यक्ष झालेले आहेत 10 व्या संमेलनाचे संमेलानाध्यक्ष हे प्रा. डॉ. दासू वैद्य आहेत.

आजपर्यंत सांस्कृतिक, साहित्यिक, लोककला, कविता, भाषा आदींचे ज्ञान देण्याचा वारसा या संमेलनाच्या माध्यमातून सुरु आहे. साहित्यातून माणूस माणसाशी जोडला जातो. विचार करण्याची उंची वाढते. तसेच कल्पना शक्तीचा विकास होतो. आपण ज्या कल्पना करतो, त्या अस्तित्वात येतात. भाषा हे साहित्य फुलवण्याचे माध्यम असून यातून व्यक्त होण्याची कला निर्माण होते.

आज या संगणक आणि इंटरनेटच्या युगात साहित्याचा दर्जा ढासाळलेला आहे. आज बोटावर मोजण्याइतपत साहित्य निर्मिती होत आहे. वाचकांचा वाचण्याचा आणि समजून घेण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. भाषेवरील प्रभुत्व नसल्यामुळे दर्जेदार साहित्याची निर्मिती कमी झालेली आहे. अशा या काळात मात्र अंबाजोगाई साहित्य संमेलनाची उंची दर वर्षी वाढत असून साहित्य निर्मितीसाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण होत आहे.पंचेवीस वर्षा पासून सुरु असलेलं हे संमेलन, साहित्य चळवळ झालेलं आहे. लोकाश्रय आणि वर्गणीतून होत असलेल्या या गावच संमेलनाने स्वत:चा रसिक वर्ग आणि साहित्य प्रेमी निर्माण करण्यात यश मिळवल आहे. लोकवर्गणी हा आर्थिक कणा, हे या संमेलनाचे बलस्थान आहे. यामुळे या संमेलनाची उंची वाढत आहे व साहित्य निर्मितीस प्रोत्साहन मिळत आहे. 

गावच्या संमेलनाची गरज का आहे ? तर गावातील, वाडीतील, भाषेला किंवा साहित्याला बळकटी मिळाली तरच ते ग्लोबल होऊ शकेल. कारण भाषा हे विचार, ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे माध्यम आहे. संपर्काची, संवादाची अभिव्यक्तीची भाषा हे माध्यम आहे. व्यक्त होण्यासाठी प्रतिभा महत्वाची आहे. प्रतिभा जर ग्लोबल करायची असेल तर बोलीभाषा, भाषा बळकट आणि प्रभावी असली पाहिजे. साहित्याला ‘लोकल ते ग्लोबल’ करायचे असेल तर अशा गावच्या साहित्य संमेलनांची गरज आहे.

  • – डॉ. राहुल धाकडे, उपाध्यक्ष, मसाप शाखा अंबाजोगाई.