दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी विधीमंडळाबाहेर सरकार विरोधात केली घोषणाबाजी
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी विधीमंडळाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदतीची मागणी यावेळी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातल्या बक्करवाडी इथं गर्भपात करताना महिलेचा झालेल्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितलं. बीड जिल्ह्यात पुन्हा सर्व गर्भलिंग निदान केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध व्यवसाय प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे दोषी आढळल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि पोलिस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यातल्या परिचारिकांच्या वेतनासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश विभागाला दिले जातील, अशी माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली.