प्रा. डॉ. दासू वैद्य, डॉ. दिलीप घारे, डॉ. वृषाली किन्हाळकर, माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथे 19, 20 आणि 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून या तीन दिवसीय साहित्य संमेलनात अध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे, प्रख्यात कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, प्रतिथयश लेखक बालाजी सुतार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, दगडू लोमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मसाप, अंबाजोगाई शाखेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाची थीम ही ‘अनिवासी अंबाजोगाईकर’ असून या संमेलनात साहित्य, कवीता, संगीत, शिक्षण, पत्रकारिता, आरोग्य, सामाजिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन अंबाजोगाई शहराचा इतर क्षेत्रात नावलौकिक वाढवणाऱ्या अधिकाधीक अनिवासी अंबाजोगाईकरांचा सहभाग राहणार आहे.
शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात या तीन दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवरील 9 सत्रांच्या आयोजनासोबतच जागर दिंडी, कला व ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन समारोह, पुरस्कार वितरण, कवी संमेलन, कथा संमेलन आणि समारोप समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय साहित्य संमेलनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात चित्रकार दिलीप बडे साहित्य नगरीतील सुर्यकांत गरुड विचारपीठाची निर्मिती करण्यात आली आहे.
या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनापुर्वी दुपारी 3 वाजता माता रमाई आंबेडकर चौकातुन जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय साहित्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहुन या संमेलनातील साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, मसापचे माजी अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक अमर हबीब, दगडु लोमटे, सचिव गोरख शेंद्रे यांनी केले आहे.