शिंदे – फडणवीस सरकारचं शासकीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट : महागाई भत्त्यात केली वाढ  ‌

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्रित सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारने निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आजही मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 

राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढेत तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल. 

पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास 

पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GEM) पोर्टलद्धारे 

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई‌ – मार्केटप्लेस (GEM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले. 

दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण 

गोविंदा पथकांना शासनाने विमा कवच द्यावा, अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखांचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.