‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी दुमदुमला परिसर : उपस्थित नागरिकांची राष्ट्रध्वजाला सलामी
अंबाजोगाई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या संकल्पनेतून आणि ‘आई’ सेंटरच्या माध्यमातून आयोजित उपक्रमात मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांकडून अंबाजोगाई शहरानजीक पिंपळा धायगुडा गावाशेजारील दूरदर्शन केंद्रा नजीकच्या परीसरात समुद्र सपाटीपासून अंदाजे दोन हजार फुट उंचीवरील डोंगरावर सर्वांत उंच ठिकाणी मोठ्या आकाराचा तब्बल 75 फुट लांबीचा तिरंगा ध्वज फडकावून तसेच राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करून प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन दिले.
यावेळी ध्वजवंदन समारंभानंतर उपस्थित तरूणांना मार्गदर्शन करताना ‘द डायनॅमिक कम्युनिकेटर’ या अमेझॉनवरील बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक, आई सेंटरचे संचालक विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवित आहे. केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘आई सेंटर’ ने मागील सात – आठ दिवसांपासून या भव्य आकारातील तिरंगा ध्वज 15 ऑगस्टच्या काळात फडकाविण्याचे नियोजन केले होते.
अंबाजोगाई, बीड जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारताचा नांवलौकिक जगात, व्हावा यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे मत या वेळेस जोंधळे यांनी व्यक्त केले. तसेच समाजात वावरताना सर्व जगभरात आदर्श असलेले भारताचे संविधान निर्माते ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील लोकशाहीच्या माध्यमातून भारत एक सशक्त राष्ष्ट्र निर्माण करण्यासाठी तरूणांना सक्षम बनविण्याचा विडा उचलून आपले योगदान देण्याचे आवाहन करीत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे म्हणाले की, आयुष्य जगत असताना आनंदी, निरोगी व तणावमुक्त राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी ध्येय असणाऱ्या गुरूजनांचे व व्यक्तींची प्रेरणा घेत त्यांचे मार्गदर्शन घेणे, चांगला मित्र परिवार असणे, आदर्श दिनचर्या, सृजनशील ज्ञानार्जन व आधुनिक युगातील कौशल्य हस्तगत करणे आवश्यक असल्याचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी सांगितले.
या उपक्रमात आयोजक सर नागेश जोंधळे, कृषी महाविद्यालय, लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, ‘स्वाराती’ चे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रप्रमुख इंजि. सदाशिव चापुले, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राहुल धाकडे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, जगन सरवदे, दादासाहेब कसबे, रणजित डांगे, डॉ. इंद्रजीत भगत, डॉ. अनंत मरकाळे, प्रा. डॉ. किरण चक्रे, राजेश रेवले, प्रेस फोटोग्राफर अशोक कचरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.