‘टकाटक 2’ : ‘अशी ही बनवाबनवी’ मधील ‘हृदयी वसंत फुलताना…’ गाणं नव्या रुपात लॉन्च

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला आले आहे. चित्रपट रिलीज होऊन 34 वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. 

आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं ‘टकाटक 2’ मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ईराणी – जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात लॉन्च करण्यात आलं. 

निर्मात्यांनी अगोदर 90 सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीतप्रेमींच्या मागणीनुसार निर्मात्यांनी संपूर्ण गाणे रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण गाणे इश्तार म्युझिकच्या यू – ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याच्या तालावर एलनाझने मराठी रसिकांना ठेका धरायला लावला आहे. ‘टकाटक 2’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, कोमल बोडखे या गाण्यात एलनाझच्या जोडीला झळकले आहेत. गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याचे पुर्नलेखन केलं असून, गायिका श्रुती राणेच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे.

राहुल संजीर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं आजही अबालवृद्धांमध्ये पॅाप्युलर आहे. ‘टकाटक 2’ च्या माध्यमातून रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ आणि पर्पल बुल एंटरटेनमेंटने जुन्या गाजलेल्या गाण्यांचा नवीन चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापर करण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे, त्यामुळे भविष्यात आणखी काही नवीन चित्रपट हा ट्रेंड वापरून नवीन चित्रपटांना जुन्या गाण्यांच्या सौंदर्याची जोड नक्कीच देतील.