अजितकुमार यांना ‘स्नेहसंवर्धन’ पुरस्कार प्रदान
अंबाजोगाई : ‘आंतरभारती’ अंबाजोगाईच्या वतीने उषा टायरचे संचालक अजितकुमार कुरूप यांना 15 ऑगस्ट रोजी एका शानदार समारंभात 9 वा ‘स्नेहसंवर्धन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी सत्कारमूर्ती राजू जागींड यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी दत्ता वालेकर होते.
‘आंतरभारती’ चे राष्ट्रीय सचिव अमर हबीब, मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, माजी सत्कारमूर्ती एम.बी. शेट्टी, कार्यक्रमाचे संयोजक अनिकेत डिघोळकर, सचिव वैजनाथ शेंगुळे, उपाध्यक्ष संतोष मोहिते, मुजीब काजी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ज्योती शिंदे यांनी केले.
अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व अंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी प्रदान केला जातो.
पठाण निजामोद्दीन यांनी अजितकुमार यांच्या दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितकुमार यांची बहीण सोलापूर येथील अजिथा कुमारी यांनी आपल्या भावाची माहिती देत या उपक्रमाचे कौतुक केले. योगिनी अनिकेत यांनी मानपत्राचे वाचन केले. मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी ‘आंतरभारती’ च्या कामाची ओळख करून देत विविध भाषांतील गीते म्हणून दाखविली. अनिकेत डिघोळकर यांनी प्रास्ताविक केले.
आगामी वाटचाल
‘आंतरभारती’ च्या आगामी वाटचालीची माहिती देताना अमर हबीब म्हणाले की, आजच्या काळात मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहणे जरुरीचे झाले आहे, म्हणून ‘आंतरभारती’ लगेच रोजगार मिळेल, असे शिक्षण घेणाऱ्या मुलींना 50 हजार रुपयापर्यंतची परतफेडीच्या अटीवर आर्थिक मदत करणार आहे. तसेच आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेला व्यवसायासाठी 50 हजार रुपयापर्यंतची मदत करणार आहे. ही मदतही परतफेडीच्या अटीवर होईल. तीन लाखांची रक्कम जमा झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात येईल. हा उपक्रम ‘आंतरभारती’ च्या महिला चालवतील. ज्योती शिंदे ह्या प्रकल्प प्रमुख राहतील. अमर हबीब यांच्या आवाहनानंतर लगेच आठ जनानी प्रत्येकी दोन – दोन हजार रुपये जमा केले.
दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्र दर्शन यात्रा सुरू करण्यात येईल, असे सांगून अमर हबीब म्हणाले की, यात्रा सहा दिवसाची राहील, तीर्थक्षेत्रे, पर्यटन क्षेत्र व सामाजिक प्रकल्प यांचा समावेश केला जाईल. ही यात्रा दिवाळीच्या सुट्टीत काढली जाईल.
‘आंतरभारती’ तर्फे ‘महात्मा गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर निबंध स्पर्धा घेतली जात आहे. 15 सप्टेंबरपर्यंत निबंध द्यायचे असून 2 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. ज्योती शिंदे ह्या उपक्रमाच्या संयोजक आहेत. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.