माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांच्या पार्थिव देहावर आज बीड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल पहाटे मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर एका भीषण अपघातात मेटे यांचं निधन झालं. 

अंत्यसंस्कारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. 

मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी, मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं. 

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, आरक्षणासाठी मेटे साहेबांनी जो लढा दिला, संघर्ष केला, तो आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही. एवढाच या ठिकाणी मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो आणि जे जे काही करावं लागेल, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या प्रसंगी मी आपल्याला सांगतो.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातले अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातल्या नागरिकांनी मेटे यांचं अंत्यदर्शन घेऊन, आपल्या लाडक्या नेत्याला साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.