राज्यातील शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’

मुंबई : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांनीही आता प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये आता दूरध्वनीवरच्या संभाषणाची सुरवात ‘हॅलो’ ऐवजी, ‘वंदे मातरम्’ ने होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही घोषणा केली.

अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत हा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.