अंबाजोगाई : भारतीय स्वातंत्र्य दिन अंबाजोगाई शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शासकीय – निमशासकीय कार्यालयात, शाळा आणि महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
शहरातील पोलिस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहणाला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासह सर्वच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळपासून शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. शाळा – महाविद्यालयात देशभक्तीपर गीत, नृत्य, पथनाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले.
सर्वांनी विवेकानंद शाळेच्या प्रभातफेरीने वेधलं लक्ष
स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शाळेच्या वतीने शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत महापुरुषांची वस्त्रे परिधान केलेली लहानं मुलं सर्वांचीच लक्ष वेधून घेत होती. लेझिम, देशभक्तीपर नृत्य, ढोल ताशांचा गजर, मुला – मुलींच्या कवायती पहाण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रभातफेरीत सादर करण्यात आलेल्या सर्व कलाप्रकाराला अंबाजोगाईकरांनी भरभरून दाद दिली.
तहसील कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालयात दिनांक 13 ऑगस्टला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात स्वतः मंजुषा मिस्कर यांनी रक्तदान केले. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार गणेश सरोदे, मिलिंद गायकवाड, पेशकार अन्वर भाई, आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे यांच्यासह महसूलचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.