भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थळ ठरावे : धनंजय मुंडे

बर्दापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

अंबाजोगाई : आपण महापुरुषांची स्मारके उभारतो, त्यांना वंदन – अभिवादन करतो, जयंती – पुण्यतिथी साजरी करतो, पण एवढ्यावरच न थांबता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महामानवाची स्मारकेही त्यांच्या विचारांची प्रेरणास्थळे सिद्ध व्हावीत, असा प्रगल्भ विचार जोपासणे गरजेचे असल्याचे मत माजी सामाजिक न्याय मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणी व सुशोभिकरण या स्मारक कामाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी 13 ऑगस्टला भूमीपूजन झाले.

सामाजिक न्याय विभागामार्फत धनंजय मुंडे हे त्या विभागाचे मंत्री असताना एप्रिल 2022 मध्ये या कामासाठी त्यांनी 1 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर केला होता. या कामाचे भुमीपूजन संपन्न होत असताना आपल्याला विशेष आंनद असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या सारखे कर्तबगार मंत्री सामाजिक न्याय खात्याला लाभल्यानंतर त्यांनी मागील काळात उत्तमरीत्या या विभागाची धुरा सांभाळली व या विभागाचा लौकिक वाढेल अशी कामगिरी केली. समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले धनंजय मुंडे व त्यांचे कार्य सदैव स्मरले जाईल, असे मत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास आ. संजय दौंड, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. विनोद जगतकर, राजकिशोर मोदी, गोविंद देशमुख, दत्ता पाटील, शंकर उबाळे, विलास सोनवणे, अनंतराव जगतकर, प्रा. एस. के. जोगदंड, लंकेश वेडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.