टीम AM : अंबाजोगाई सारख्या छोट्या गावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. याचे कुतुहल आजही महाराष्ट्रातील वैद्यकीय, राजकीय क्षेत्रातील लोकांना वाटते. मराठवाड्यात औरंगाबादनंतर नांदेड, लातूरला नाही तर अंबाजोगाईला वैद्यकीय महाविद्यालय उघडले गेले. हे आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय होते. याचे संपूर्ण श्रेय डॉ. व्यंकटराव डावळे यांना जाते.
आजच्या काळातही परभणी, उस्मानाबाद या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जनतेला मागण्या, संघर्ष करूनही अनेक अडचणीला सामोरे जावे लागते आहे. त्या काळात जेव्हा डॉक्टरांची कमतरता असतानाही अंबाजोगाई सारख्या गावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे व ते उभा करणे हे प्रचंड अवघड काम होते.
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावचे व त्या काळात उस्मानिया विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन नंतर इंग्लंडला ‘फआरसीएस’ चे शिक्षण घेऊन भारतात आलेले डॉ. व्यंकटराव डावळे (आण्णा) हे अंबाजोगाई सारख्या गावात चेस्ट & जनरल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक या पदावर नोकरीच्या निमित्ताने आले.
वैद्यकीय सेवा देता – देता आपल्या वैयक्तिक ओळखी, कौटुंबिक नातेसंबंध, माहिती व ज्ञान याचा पुरेपूर वापर करून व सातत्याने पाठपुरावा करून अंबाजोगाई सारख्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून तर आणलेच पण त्याची उभारणी ही डॉ. डावळेंच्या नेतृत्वाखाली झाली.
अंबाजोगाईची देशपातळीवरची ओळखही इथले मेडिकल कॉलेज आहे. दररोज हजारो गरीब रूग्ण इथे येतात. हजारो विद्यार्थी इथे शिक्षण घेऊन गेले. कोरोना कालखंडात तर मराठवाड्यात औरंगाबादनंतर सर्वाधिक शासकीय खाटांची व्यवस्था अंबाजोगाई येथे झाली. हजारो रूग्णांना जीवनदान मिळाले.
अंबाजोगाई व परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व जिव्हाळ्याची संस्था असणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाईचे निर्माते डॉ. व्यंकटराव डावळे यांना स्मृतीदिनाच्या निमित्ताने कृतज्ञता पुर्वक विनम्र अभिवादन ! – डॉ. सचिन काळे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, महाराष्ट्र)