‘रूप नगर के चीते’ 16 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
मुंबई : मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 24 तासांत या गाण्याने 2 मिलियन्स अर्थात 20 लाख व्हूयुजचा टप्पा पार करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मनाला भिडणारी शब्दरचना आणि संगीताचा सुमधुर ठेका याने सजलेल्या या गाण्याला बॉलिवूड संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे.
जय अत्रे यांनी लिहिलेलं ‘होऊन जाऊ दे’ हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल या युवा अभिनेत्यांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. दोन मित्रांची धमाल केमिस्ट्री या गाण्यातून पहायला मिळतेय. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा या चित्रपटातून पहाता येणार आहे.
‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट गाणी दिल्यानंतर आता मराठीच्या संगीत क्षेत्रातल्या पदार्पणातही त्यांच्या ‘होऊन जाऊ दे’ गाण्याने कमाल केली आहे. ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची धुराही मनन शाह यांनी स्वत: सांभाळली असून, चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांचे आहे. ‘एस एंटरटेन्मेंट’ बॅनरखाली ‘रूप नगर के चीते’ 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होणार आहे.