मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर 40 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राजभवनात 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. आज संध्याकाळपर्यंत या सर्व मंत्र्यांचे खातेवाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
बीड जिल्ह्याचा भ्रमनिरास
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद मिळणार ? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पण मंत्रिमंडळ विस्तारात जिल्हृयाचा भ्रमनिरास झाला असून एकालाही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही. त्यामुळे अजून काही दिवस तरी जिल्ह्याला मंत्रीपदासाठी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे बीड जिल्हयाचे पालकमंत्री कोण होतील ? याकडे आता जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.