अंबाजोगाईत 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान ‘स्मृती सद्भावना’ समारोहाचे आयोजन

गुरुवार दिनांक 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन

‘स्मृती सद्भावना’ समारोहाचा अंबाजोगाईकरांनी लाभ घ्यावा –  राजकिशोर मोदी

अंबाजोगाई : शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख व लोकनेते बाबूराव आडसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान ‘स्मृती सद्भावना’ समारोह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे .

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख व माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान अपरिमित असे आहे. त्यांच्या या भरीव योगदानातून काही अंशी उतराई व्हावी, या हेतूने प्रतिवर्षी प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने ‘स्मृती सद्भावना’ समारोहाचे आयोजन करण्यात येत आहे. या  समारोहामध्ये गुरुवार दिनांक 11 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रीय समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन आयोजित केले आहे.

दिनांक 12 रोजी शुक्रवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियानातंर्गत शहरातील नागरिकांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच शनिवार दि.13 रोजी दिव्यांग व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिनकर जोशी व संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. सद्भावना समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन राजकिशोर मोदी, दिनकर जोशी यांनी केले आहे.