हत्तीखाना परिसरात घाणीचे साम्राज्य : पुरातत्व विभागाचे, नगरपरिषद‌ प्रशासनाचे दुर्लक्ष

पर्यटकांनी व्यक्त केला संताप : शाळकरी मुलांचा ‌‌भ्रमनिरास

टीम AM : मराठवाड्याची अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईतील हत्तीखाना परिसराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे पुरातत्व विभागाचे आणि नगरपरिषद प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने पर्यटकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अंबाजोगाईची अध्यात्मिक शहर म्हणून संपूर्ण मराठवाड्यासह राज्यात ओळख आहे. शहरात आद्यकवी मुकुंदराज, संत दासोपंत यांची समाधी आहे. त्यासोबतच योगेश्वरी देवी, रेणूका देवी यासह देवीदेवतांची अनेक मंदिरे आहेत. योगेश्वरी देवीच्या मंदिरासमोरचं काही अंतरावर हत्तीखाना परिसर आहे. हा हत्तीखाना शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. आज जरी त्याची पडझड झाली असली तरी अनेक ‌‌‌पर्यटक या हत्तीखाना परिसराला भेट देण्यासाठी येत असतात. 

परंतू, अंबाजोगाईच्या या अनमोल ठेव्याकडे ‌पुरातत्व विभागाने आणि नगर परिषदेनेही साफ दुर्लक्ष केल्याने परिसराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, दारुच्या बाटल्या, गुटखा – सिगारेटच्या पुड्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात आल्यानंतर पर्यटक सदरिल परिस्थिती पाहून नाराजी व्यक्त करत आहेत.

पुरातत्व विभागाने, नगरपरिषदेने द्यावे लक्ष

अंबाजोगाई शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हत्तीखाना परिसर आज शेवटची घटका मोजत आहे. पुरातत्व विभागाने या हत्तीखाना परिसराला गतवैभव प्राप्त ‌‌‌करुन देण्यासाठी ‌‌‌प्रयत्न करायला हवेत.‌ गेल्या कित्येक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करीत असल्याने हत्तीखाना परिसराचा बराच भाग जीर्ण झाला आहे. परिसरातील अनेक मुर्ती, शिल्पांची मोडतोड झाली आहे. त्यावर संशोधन करुन त्याची‌ पुन्हा उभारणी झाली पाहिजे. नगरपरिषद प्रशासनाने देखील गावचा ठेवा म्हणून परिसरात वारंवार स्वच्छता करणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. ‌‌‌‌

शाळकरी मुलांचा होतोयं भ्रमनिरास

अंबाजोगाई शहरातील अध्यात्मिक, निसर्गरम्य स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक शाळा सहलीचे आयोजन करतात. सहलीसाठी आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधी परिसराकडे जाताना आवर्जून हत्तीखाना परिसराला या शाळा भेट देत असतात. तिथं गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून शाळकरी मुलांचा ‌‌भ्रमनिरास होतो. दारुच्या बाटल्या, गुटखा, सिगारेट पडलेली पाहून शिक्षक, मुल‌ं नाराजी व्यक्त करतात. शिक्षक, शाळकरी मुलांकडूनही हत्तीखाना परिसराची ‌‌दयनीय अवस्था दूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.