बीड : भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील अविनाश साबळेनं शनिवारी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये ‘रौप्य’ पदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमधील हे भारताचे पहिलेच पदक होते.
स्टीपलचेस ही एक अडथळ्यांची शर्यत असते, जिथं ट्रॅकवर पाणीही असतं, त्यातून मार्ग काढत 3000 मीटरचं अंतर पार करायचं असतं. अविनाश साबळेनं 8 मिनिट 11.20 सेकंदात रेस पूर्ण केली आणि तब्बल दहाव्यांदा नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावावर केलं.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल बीड जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातल्या अविनाश साबळेंचं सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. स्टीपलचेस प्रकारात नॅशनल रेकॉर्ड नावावर असणाऱ्या अविनाशचा प्रवासही प्रेरणादायी आहे.
बीड जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशला शाळेत जायला गाडी मिळायची नाही, म्हणून हा कार्यकर्ता 6 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत पळत जायचा. इथूनच त्याला पळण्याची गोडी लागत गेली. 12 वी झाल्यावर तो सैन्यात भरती झाला.
महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना त्याची पोस्टिंग सियाचीन, राजस्थान अशा दुर्गम ठिकाणी झाली. 2015 मध्ये इंटर आर्मी क्रॉसकंट्री स्पर्धेत भाग घेण्यापासून सुरुवात करत अविनाश पुढं स्टीपलचेसमध्ये उतरला.
2018 मध्ये एशियन गेम्समध्ये क्वालिफाय होण्याची संधी हुकल्यानंतर त्यानं नॅशनल रेकॉर्ड केला. नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये वर्चस्व गाजवलं. अमेरिकेत झालेल्या 5000 मीटरच्या रेसमध्ये जेव्हा अविनाशनं बाजी मारली, तेव्हा बीडमध्ये तोफा वाजवून जल्लोष करण्यात आला होता.