काँग्रेस पक्षाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात ‘आझादी गौरव पदयात्रा’
अंबाजोगाई : देशातील सर्वसामान्य माणूस आजही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडला असल्याचे सांगुण न्याय व्यवस्थाच आता भारतीय लोकशाहीला बळकट करेल, असा विश्वास आ. धिरज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
काँंग्रेस पक्षाच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 कि. मी. अंतरावर ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढण्याचे निर्देश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेले आहेत. त्यानूसार बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि बांधणीत ज्यांनी योगदान दिले. त्या सर्वांचा गौरव या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावातून ही यात्रा निघून या यात्रेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे आ. धिरज विलासराव देशमुख यांनी अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अंबारी शासकीय विश्रामगृहात शनिवार, दि. 6 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. धिरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सरचिटणीस लक्ष्मणराव पौळ, नवनाथराव थोटे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप, नारायणराव होके, दत्ता कांबळे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना आ. धिरज देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा. रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अनेक तालुक्यात 75 कि. मी. ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आझादी गौरव पदयात्रेचे चांगले नियोजन केले आहे. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ही यात्रा मंगळवार, दि. 9 ऑगस्ट रोजी शिरूर कासार या तालुक्यातून सुरू होईल. तालुकाध्यक्ष रमेश सानप हे या यात्रेचे संयोजन करतील, बुधवार, दि. 10 ऑगस्ट रोजी ही यात्रा गेवराई तालुक्यातून निघेल, तालुकाध्यक्ष महेश बेद्रे हे या यात्रेचे संयोजन करतील.
गुरूवार दि.11 ऑगस्ट रोजी माजलगाव येथून ही यात्रा निघेल, तालुकाध्यक्ष महाविर काका मस्के हे या यात्रेचे संयोजन करतील, शुक्रवार, दि.12 ऑगस्ट रोजी ही यात्रा सकाळी परळी येथून निघेल, तालुकाध्यक्ष प्रा. अनिल जाधव व शहराध्यक्ष सय्यद हनिफ सय्यद करीम (बहाद्दूरभाई) हे या यात्रेचे संयोजन करतील, याच दिवशी दुपारी ही यात्रा अंबाजोगाई तालुक्यातूनही निघेल, तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे हे या यात्रेचे संयोजन करतील, रविवार, दि. 14 ऑगस्ट रोजी ही यात्रा केज तालुक्यातून निघेल, तालुकाध्यक्ष अमर पाटील हे या यात्रेचे संयोजन करतील. यात्रेची सांगता 15 ऑगस्ट रोजी बीड येथे होईल. याचे संयोजन तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे हे करतील. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनतेचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा गौरव या यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
या प्रसंगी आ. देशमुख यांनी सध्याची राजकिय परिस्थिती, ईडी, सीबीआय, आयकर या सारख्या सरकारी यंत्रणांचा राजकिय वापर या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना नेमक्या शब्दांत उत्तरे दिली.
जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
प्रारंभी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी ‘आझादी गौरव पदयात्रा’ आढावा बैठक आणि आझादी गौरव झेंडा महोत्सवाची तयारी या बाबतची माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या आयोजनाबाबत तपशीलवार सांगितले. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अनेक तालुक्यात 75 कि. मी. ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले तर पत्रकार परिषदेच्या शेवटी उपस्थितांचे आभार बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मानले. या पत्रकार परिषदेस बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध विभाग, सेलचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.